Jaya Prada In Jail : बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभेच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नईतील विशेष न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चित्रपटगृहांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआय रक्कम कापल्याच्या प्रकरणावरून जया प्रदा यांच्यासह त्यांचे बिझनेस पार्टनर राम कुमार आणि राजा बाबू यांनाही कोर्टाने दोषी ठरवलं आहे. कोर्टाने जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा तर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. थिएटरमधील स्टाफच्या वेतनातून ईएसआय कापण्यात आल्यानंतर त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून त्यात जया प्रदा यांच्यासह अन्य दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी राम कुमार यांच्या मदतीने एक चित्रपटगृहाचा व्यवसाय केला होता. परंतु त्यात सातत्याने तोटा होत असल्याने अचानक चित्रपटगृह बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ईएसआय रक्कम कापण्यात आली होती. त्यामुळं नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी जय प्रदा यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. याशिवाय श्रम विमा कंपनीनेही जया प्रदा यांच्यासह दोघांवर कोर्टात खटला दाखल केला होता. त्यानंतर जया प्रदा यांच्याकडून कोर्टात कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन दिलं जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांनी कर्मचाऱ्यांना पैसे दिले नाही, त्यानंतर कोर्टाने त्यांना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
जया प्रदा या १९७० आणि १९८० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. तेलुगू चित्रपटांतून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं. बॉलिवूडमधील 'शराबी', 'थानेदार' आणि 'तोहफा' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये जया प्रदा यांनी काम केलं होतं. चित्रपटसृष्टीत करियर केल्यानंतर जया प्रदा या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या होत्या. त्यामुळं आता चेन्नईतील कोर्टाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावल्याने बॉलिवूडमध्ये अनेकांना धक्का बसला आहे.