Bollywood Actress Jacqueline Fernandez Complaint: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून ‘महाठग’ सुकेश चंद्रशेकर प्रकरणामुळे चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरने केलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली होती. या प्रकरणात जॅकलिन अजूनही अडकली असतानाच दुसरीकडे सुकेश चंद्रशेखर देखील तुरुंगात कैद आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सुकेश तुरुंगातून तिला सतत पत्र लिहून, त्रास देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. आता याप्रकरणी जॅकलिनने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे सुकेशविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून याबद्दल तक्रार दाखल केली होती. यात तिने लिहिले होते की, ‘मी एक जबाबदार नागरिक आहे. मला जबरदस्तीने या प्रकरणात गोवले जात आहे. सध्या ही बाब देशाच्या कायद्याच्या कक्षेपासून आणि पारदर्शकतेपासून कोसो दूर आहे. विशेष सेलने मला सरकारी साक्षीदार बनवल्यापासून सुकेश सतत माझ्यावर निशाणा साधत आहे. माझ्यावर सतत मानसिक दबाव निर्माण केला जात आहे. कारागृहाच्या तुरुंगात बसलेला सुकेश मला सतत धमक्या देत आहे आणि त्रास देण्यासाठी नवनवीन डावपेच वापरत आहे.’
जॅकलिनने दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सुकेश चंद्रशेखर देत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली पोलिसांना आयपीसीच्या कलमांतर्गत या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जॅकलिन फर्नांडिस सध्या या प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुकेश चंद्रशेखर हा जॅकलिन फर्नांडिससाठी पत्र लिहित आहे. सुकेश कधी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देतो. तर, कधी जॅकलिन फर्नांडिससाठी वेगवेगळ्या कविता लिहितो. मात्र, त्याच्या याच हरकतींमुळे आता जॅकलिन फर्नांडिस वैतागली आहे. आता तो तिला तुरुंगातून धमकी देखील देत असल्याचे जॅकलिन फर्नांडिसने म्हटले आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसकडे सध्या फारसे प्रोजेक्ट नाहीत. ती अखेर २०२२मध्ये ‘सर्कस’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर जॅकलिन फर्नांडिस अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटातील एका खास गाण्यात दिसली होती. याशिवाय त्याच्याकडे सध्या दोन चित्रपट आहेत. ‘वेलकम टू जंगल’ या मल्टीस्टारर चित्रपटात ती झळकणार आहे.