बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. अभिनेता अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो, त्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देतो. अशातच आता अभिनेत्याचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. खरं तर, ट्विटरच्या आस्क मी एनीथिंग या फिचरच्या माध्यमातून एका चाहत्याने अभिनेत्याला ओटीपी विचारला होता. त्यावर शाहरुखने तर उत्तर दिलेच. पण मुंबई पोलिसांनी देखील उत्तर देत चाहत्याची फिरकी घेतली आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...
मुंबई पोलीस गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांविरोधात कडक कारवाई करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही ते लोकांशी जोडले गेले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका चाहत्याने शाहरुख खानकडे ओटीपी मागितला असता पोलिसांनी उत्तर देत चाहत्याची फिरकी घेतली आहे.
आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये एका युजरने शाहरुख खानला विचारले, 'सर, एक ओटीपी आला असेल, मला सांगा.' या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, 'बेटा, मी खूप फेमस आहे, मला ओटीपी येत नाहीत. मी जेव्हा सामान मागवतो तेव्हा ते विक्रेते मला पाठवतात. तू स्वत:ची काळजी घे.' हे उत्तर मुंबई पोलिसांनी पाहिले आणि त्यावर तातडीने उत्तर दिले आहे. मुंबई पोलिसांनीही या ट्विटला मजेशीर अंदाजात उत्तर देत '१००' असे म्हटले. १०० हा मुंबई पोलिसांचा टोल फ्री नंबर आहे. मात्र हे ट्विट जवळपास दीड वर्ष जुने आहे, जे आता रेडिटवर व्हायरल होत आहे.
वाचा: 'हिना खानचा कॅन्सर प्रवास हा पीआरने प्लान केला होता', अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
शाहरूखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा पठाण हा सिनेमा २०२३मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याने जवान आणि डंकी सारख्या चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पठाणने जागतिक स्तरावर सुमारे १०५० कोटी रुपयांची कमाई केली आणि जवानने हा विक्रम मोडीत काढून ११५० कोटींचा गल्ला जमवला. हा सिनेमा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता आपली मुलगी सुहाना खानसोबत किंग या चित्रपटात दिसणार आहे.
संबंधित बातम्या