बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरात गुरूवारी मध्यरात्री चोरी झाली. चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर सैफला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यात सैफच्या मानेला, पाठीला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. २४ तासांहून अधिक काळ लोटला आणि सैफ अजूनही रुग्णालयातच आहे. आता सैफची प्रकृती कशी आहे याबाबत माहिती समोर आली आहे.
लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी म्हणाले, सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता, पण आमच्या टीमने त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. सध्या ते आयसीयूमध्ये असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एक-दोन दिवसात त्यांना जनरल वॉर्डात हलवण्यात येईल, अशी आशा आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान शुद्धीवर आलेला नाही. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनाच त्याला भेटण्याची परवानगी आहे. त्यामुळे सैफची आई शर्मिला टागोर हा काल संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी रूग्णालयात गेल्या होत्या. तसेच सैफची पत्नी करीना, मुलगा इब्राहिम, मुलगी सारा सर्वजण रूग्णालयात जाताना दिसत आहेत. आता सैफला डिस्चार्ज कधी मिळणार हे याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
डॉ. नीरज उत्तमणी यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, सैफला सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत. या जखमांपैकी दोन किरकोळ, दोन खोल आणि दोन अत्यंत खोल आहेत. एक जखम पाठीवर, मणक्याजवळ झाली आहे. नीरज उत्तमणी म्हणाले, 'चाकूच्या दुखापतीमुळे सैफच्या पाठीच्या कण्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. तेथे चाकूचा तुकडा अडकला होता. तो तुकडा काढण्यासाठी आणि पाठीचा कणा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय त्याच्या डाव्या हातावर आणि मानेच्या उजव्या बाजूला दोन खोल जखमा होत्या, ज्या प्लास्टिक सर्जरीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत. अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे."
संबंधित बातम्या