Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award:बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘मिथुन दा यांचा उल्लेखनीय चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे.’
अश्विनी वैष्णव यांनी पुढे लिहिले, ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल महान अभिनेते मिथुन चक्रवर्तीजी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाईल.’
अभिनेतेमिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, तमिळ आणि बंगालीसह ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९७६मध्ये आलेल्या'मृगया' चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. १९८२मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या'डिस्को डान्सर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती सुपरस्टार झाले. या चित्रपटाने आशिया,सोव्हिएत युनियन,पूर्व युरोप,मध्य पूर्व,तुर्की आणि आफ्रिकेत उत्कृष्ट व्यवसाय केला होता.
मिथुन चक्रवर्ती अलीकडच्या काळात'ओह माय गॉड'सारख्या चित्रपटात दिसले होते. याशिवाय त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत'अग्निपथ', 'मुझे इंसाफ चाहिये', 'हम से है जमाना', 'पसंद अपनी अपनी', 'घर एक मंदिर'आणि'कसम पैदा करने वाले की'आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
मिथुन चक्रवर्ती केवळ अभिनयातच नाही, तर ॲक्शन आणि डान्समध्येही निष्णात आहेत. बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे आणि ते स्वतः ब्लॅक बेल्ट देखील आहेत. मिथुन चक्रवर्ती ८०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्याला नवी ओळख दिली. एक काळ असा होता की, मिथुन यांच्या डान्समुळेच चित्रपट हिट झाले होता.