Bollywood Actor in Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा २’ बऱ्याच काळापासून चर्चेचा भाग बनला आहे. सतत या चित्रपटाबद्दल नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा या चित्रपटाविषयीचे नवीन रिपोर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह ‘पुष्पा २’ चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात रणवीर सिंह पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या चित्रपटात रणवीर सिंह एक सरप्राईज एलिमेंट म्हणून दिसणार आहे आणि त्याच्या पात्रामुळे चित्रपटात मोठा ट्विस्ट येणार आहे. मात्र, रणवीर सिंह ‘पुष्पा २’मध्ये दिसणार का, यावर स्वतः रणवीरने किंवा ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता ‘पुष्पा २’मधून दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटातील दमदार व्यक्तिरेखेसह तो दाक्षिणात्य प्रेक्षकांना देखील आपल्या चाहत्यांच्या यादीत सामील करणार आहे.
आता साऊथचा चित्रपट जर रणवीरच्या हाती लागला असेल, तर यामुळे त्याला भविष्यातील नव्या प्रोजेक्ट्समध्ये मदत होईल. ‘पुष्पा २’च्या टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या पहिल्या झलकेपासून ते अल्लू अर्जुनच्या लूकपर्यंत, प्रत्येक गोष्टींनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दुसरीकडे, अभिनेता रणवीर सिंह बऱ्याच दिवसांपासून एका हिट चित्रपटाची वाट पाहत आहे. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ‘सर्कस’ बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. आता रणवीर सिंह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहर तब्बल ६ वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. आता रणवीर सिंहचे नाव ‘पुष्पा २’मध्ये सामील झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आतुरता आणखी वाढली आहे. बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ म्हणजेच रणवीर सिंह पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार शैलीने लोकांना प्रभावित करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.