Suhas Khamkar In Marathi Movie : पोलिस अधिकाऱ्यांना ध्येय प्राप्तीसाठी केलेले कठोर परिश्रम आणि त्यासाठीचा संघर्ष हाच त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. अशाच एका नायकाच्या प्रेरणादायक गोष्टीला'राजवीर' या चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात लढा देणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या धाडसी प्रवासाची कथा या चित्रपटात पाहता येणार आजे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटातून बॉडीबिल्डर सुहास खामकर चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे.
याचित्रपटाच्या कथानकानुसार, राजवीर (सुहास खामकर) हा एक आयपीएस अधिकारी आहे, जो ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे आपल्या जवळच्या मित्राचा मृत्यू झाल्यामुळे ड्रग्ज रॅकेट उधळून टाकण्याचा निश्चय करतो. या लढाईमध्ये त्याला अनेक अडथळ्यांना तोंड देऊन त्याचं ध्येय साध्य करायचं असतं. राजवीरच्या प्रवासात अनेक आव्हाने, संकटे आणि थरारक प्रसंग उभे राहतात, ज्यात त्याचं धाडस आणि चिकाटी याचा जोरदार पर्दाफाश होतो.
चित्रपटात सुहास खामकर यांनी'राजवीर' या आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉडीबिल्डर असलेले सुहास खामकर ट्रेलरमध्ये धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्समध्ये दिसून येतात, ज्यामुळे त्यांच्या अभिनयाची आणखीच प्रशंसा होत आहे. याच कारणामुळे'राजवीर' चित्रपट प्रेक्षकांसाठी एक आव्हानात्मक आणि थरारक अनुभव ठरू शकतो.
'राजवीर' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असून, त्यात एकूणच पोलिस अधिकाऱ्याच्या कठोर मेहनती, धाडस आणि दृढनिश्चयाची गोष्ट उलगडणार आहे. अॅक्शनप्रेमी आणि ड्रामा रसिकांसाठी हा चित्रपट एक नवा अनुभव देईल, असा विश्वास आहे. त्यामुळे, 'राजवीर' हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा!
'राजवीर' हा चित्रपट साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी यांनी निर्माती केलेला असून, रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. अॅक्शन, ड्रामा आणि थरार यांचे उत्कृष्ट मिश्रण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन साकार राऊत आणि स्वप्नील देशमुख यांनी केले आहे. साकार राऊत, जेकॉब, पॉल कुरियन आणि माज खान यांचं कथालेखन आणि पटकथा संवादलेखन देखील उत्तम आहे. छायांकन भूषण वेदपाठक यांचं असून, संगीत दिग्दर्शन अभिनंदन गायकवाड आणि होपून सैकिया यांनी केलं आहे. संकलन साकार राऊत आणि कश्यप कुलकर्णी यांनी केलं आहे.