'ब्लॅक पँथर' या हॉलिवूड चित्रपटात स्टंटमॅन म्हणून काम केलेल्या तराजा रामसेसचा अपघाती मृत्यू झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जॉर्जिया महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तराजाचा मृत्यू झाला. वयाच्या ४१व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. तराजासोबत त्याच्या तीनही मुलांचे देखील निधन झाले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
हॅलोवीनच्या रात्री मुलांनी भरलेले पिकअप ट्रक रामसेस चालवत होता. हा ट्रक ट्रॅक्टरला धडकला. या दुर्घटनेत तराजाची १३ वर्षांची मुलगी रामसेस, १० वर्षांचा मुलगा किसासी आणि नवजाच मुलगी फुजिबोचे देखील निधन झाले. या दुर्घटनेने सर्वांना हादरुन टाकले आहे.
वाचा: गौरव मोरे- वनिता खरातच्या 'सलमान सोसायटी'चा ट्रेलर पाहिलात का?
तराजाच्या मृत्यूनंतर त्याची आई अयकीलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, "माझा सुंदर, प्रेमळ, हुशार मुलगा तरजा,त्याची १३ वर्षांची मुलगी सुंदरी, १० वर्षांचा मुलगा किसासी आणि ८ आठवड्यांची नवजात मुलगी फुजिबो यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. माझा १० वर्षांचा नातू किससी, "सॉस द बॉस" हा लाइफ सपोर्टवर आहे" असे लिहिले आहे.
तराजाच्या आईने पुढच्या पोस्टमध्ये किससीच्या निधनाची माहिती दिली आहे. "किससी हा त्याच्या वडिलांकडे आणि बहिणीकडे गेला आहे" या आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली. सध्या सोशल मीडियावर तराजाच्या आईची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
तराजा हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील स्टंट मॅन म्हणून विशेष ओळखला जात होता. त्याने अॅव्हेंजर एंडगेम आणि ब्लॅक पँथर सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठीही काम केले. या चित्रपटांनी त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्याने द सुसाईड स्क्वॉड, क्रीड III, द हंगर गेम्स: कॅचिंग फायर, एमेंसिपेशन आणि द हार्डर दे फॉल या चित्रपटात काम केले. तराजाच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.
संबंधित बातम्या