बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासाठी अवघं जग दिवानं झालं होतं. मनोरंजन विश्वात अशीच एक अभिनेत्री होती, जिच्या सौंदर्याचं जगभारत कौतुक झालं. जिचा एकेकाळी इंडस्ट्रीत दबदबा होता, पण आज ती चित्रपटांपासून दूर आपलं आयुष्य जगत आहे. ही अभिनेत्री आहे आयेशा टाकिया... आयेशा टाकिया ही एकेकाळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत 'वाँटेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध होती. पण, आता ती या इंडस्ट्रीतून गायब झाली आहे. सलमान खानची सुंदर अभिनेत्री आयेशा टाकिया आज (१० एप्रिल) तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १० एप्रिल १९८६ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा चित्रपट प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल...
अभिनेत्री आयेशा टाकियाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी ती फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उड उड जाये' या गाण्यात दिसली होती. आयेशाने 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारही मिळाला होता. मात्र, आयेशाला तिची खरी ओळख सलमान खानच्या 'वॉन्टेड' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटामुळे ही अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली.
आयेशा टाकियाच्या लव्ह लाईफचीही खूप चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाचा भाऊ सिद्धार्थ कोईरालाला डेट केले होते. याशिवाय अश्मित पटेलसोबतच्या तिच्या अफेअरची चर्चाही चांगलीच रंगली होती. मात्र, मनोरंजन विश्वाला तेव्हा धक्का बसला, जेव्हा आयेशा टाकिया तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करून घर संसार थाटला.
आयेशा टाकियाने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्री 'पाठशाला', 'मोड' आणि 'आपके लिए हम हैं' सारख्या काही चित्रपटांमध्ये दिसली. पण, तिचे हे चित्रपट फारसे हिट झाले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयेशा टाकियाने चित्रपटांपासून दूर राहण्याचे मोठे कारण म्हणजे तिने किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. तिला किसिंग सीन नसणारे चित्रपट करायचे होते. पण, हळूहळू तिचे बॉलिवूडशी असलेले नाते संपुष्टात आले.
आयेशा टाकिया चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेमुळे खूप चर्चेत होती. यामुळे त्याला अनेकवेळा ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.
संबंधित बातम्या