छोट्या पडद्यावरील सर्वांना हसायला भाग पाडणारा कॉमेडी शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ ओळखला जातो. या शोमधील ‘गुत्थी’ हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या भूमिकेने त्याला घराघरांत ओळख मिळवून दिली होती. अभिनेता सुनील ग्रोव्हर आज ३ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करत आहे. सुनील ग्रोव्हरने टीव्हीसोबतच अनेक चित्रपट आणि अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये तो झळकला आहे. पण, सुरुवातीपासूनच हे यश त्याच्या पदरी पडलं नाही. हे यश मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.
अभिनेता सुनील ग्रोव्हरचा जन्म १३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यात झाला. त्याने १९९८मध्ये अभिनेता अजय देवगनच्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर तो २००२मध्ये 'लिजेंड ऑफ भगत सिंह' या चित्रपटात दिसला होता. मात्र, 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा'मधून सुनील ग्रोव्हरला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.
आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढताना अभिनेता सुनील ग्रोव्हर याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘एक वेळ होती, जेव्हा मी फक्त ५०० रुपये कमावत होतो. पण मला विश्वास होता की, मी नक्की यशस्वी होईन.’ सुनील ग्रोव्हरने या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याने अनेक वेळा नकार पचवले, तो हरला, पडला...पण त्याने कधीच हार मानली नाही. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो एक यशस्वी अभिनेता आहे.
वाचा: 'आगाऊ नको, डांबरट नको…', छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी
'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमधील त्याने साकारलेले 'गुत्थी' हे पात्र लोकांना खूप आवडले होते. त्याचा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. सुनील ग्रोव्हरने साकारलेल्या 'गुत्थी'ला जे प्रेम मिळालं, ते फार कमी विनोदवीरांच्या वाट्याला येतं. या शोच्या यशानंतर सुनीलने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने साकारलेले ‘रिंकू भाभी’ हे पात्र असो वा ‘डॉ. मशहूर गुलाटी’ सगळ्यांनाच चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.