१९९७ साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. या पहिल्यावहिल्या चित्रपटाने महिमाला रातोरात स्टार बनवले होते. या चित्रपटात महिमासोबत शाहरुख खान , अमरीश पुरी, अपूर्व अग्निहोत्री हे कलाकार दिसले होते. महिमा ही तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत होते. आज १३ सप्टेंबर रोजी महिमाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी.
महिमाने एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील कटू सत्य सांगितले होते. तिने 'हिंदुस्तान टाइम्सा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पहिलेपेक्षा आता सुधारणा झाली आहे. आता इंडस्ट्रीमध्ये महिलांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. आता अभिनेत्रींना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येतात. तसेच त्यांना तगडे मानधन देखील मिळते.
करिअरच्या सुरुवातीविषयी बोलताना महिमा म्हणाली होती की, 'अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले जायचे. ती अभिनेत्री कोणाला डेट करत असेल तर लोक म्हणायचे अरे देवा, हि तर डेट करत आहे. आम्हाला व्हर्जिन अभिनेत्री हवी आहे जिने कधी किस देखील केलेले नाही. जर तुम्ही लग्न करत असाल तर तुम्हाला काम मिळणेच बंद होते. त्यासोबतच जर तुम्हाला मुले असतील तर तुमचे करिअर संपले.'
महिमा ‘दिल क्या करे’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. एक दिवस ती स्वत: गाडी चालवत सेटवर पोहोचत होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने तिच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये महिमा गंभीर जखमी झाली. जवळपास ६७ काचांचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर रुतून बसले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
वाचा: अनिल मेहता मलायका अरोराचे खरे वडील नाहीत? काय आहे सत्य जाणून घ्या
कामाविषयी बोलायचे झाले तर महिमा चौधरी लवकरच अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमरजेंसी' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. महिमा कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट सर्वजण पाहात आहेत.