बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन चित्रपटांतील तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यासोबतच तिचे सौंदर्य अनेकांवर आजही भूरळ घालते. कल्कीने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज १० जानेवारी रोजी कल्कीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
कल्की ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. पण एकदा कल्कीने प्रसारमाध्यमांवर खासगी आयुष्याविषयी वक्तव्य केले होते. तिला बालपणी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले होते.
वाचा: माधुरीचा 'पंचक' हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन
अभिनेत्री कल्की कोचलीनने बालवयात झालेल्या लैंगिक शोषणाबद्दलचे वास्तव ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आपल्यावर ओढावलेला लैंगिक शोषणाबद्दल बोलताना कोणताही कमीपणा किंवा इतरांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल याचा अजिबात विचार करत नसल्याचे कल्कीने मुलाखतीत दिलखुलासपणे सांगितले.
“माझ्याबद्दल इतरांनी सहानभुती दाखवावी यासाठी माझ्यासोबत बालवयात झालेल्या लैंगिक शोषणाची घटना सांगण्याचा उद्देश नाही. तद्वत तसा विचार करणे देखील एक स्त्री म्हणून योग्य ठरणार नाही. या प्रसंगाला सामोरे गेलेल्या माझ्यासारख्या इतरांनाही बिनदिक्कतपणे बोलण्याचा आत्मविश्वास यावा हा यामागचा उद्देश आहे. तसेच त्यावेळी आपलीच चूक असल्याचे मला वाटत असल्यामुळे मी आईला झालेल्या घटनेबद्दल सांगण्यास घाबरले आणि गप्प बसले. तेव्हाच जर माझ्यात सेक्स या विषयी बोलण्याचा आत्मविश्वास असता तर, उघडपणे पालकांसोबत बोलता आले असते. मूळात ‘सेक्स’ या शब्दाविषयीची गूढता पालकांनी नाहीशी केली पाहिजे जेणेकरून मुलांना या विषयाबद्दल मोकळेपणाने बोलता येईल आणि लैंगिक शोषणांच्या घटनांना आळा बसेल” असे कल्की म्हणाली होती.
कल्कीच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले होते. मात्र, त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर कल्की बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत राहू लागली. त्यांना एक मुलगी देखील आहे.