‘आखरी पास्ता’ असे नाव जरी घेतले तरी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेता चंकी पांडे डोळ्यासमोर उभा राहातो. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणून चंकी पांडे विशेष ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास ८५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण कधीही चंकी पांडेला मुख्य भूमिका मिळाली नाही. नेहमी सहाय्यक अभिनेता म्हणून काम करणाऱ्या चंकी पांडेचा आज २६ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
चंकी पांडेचा जन्म २६ सप्टेंबर १९६२ रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी चंकी पांडेला प्रचंड मेहनत करावी लागली होती. बॉलिवूडमध्ये जरी चंकीला केवळ सहाय्यक भूमिका दिल्या गेल्या असल्या, तरी एका देशात मात्र चंकी पांडे सुपरस्टार म्हणून ओळखला जात होता. जेव्हा बॉलिवूडमध्ये चंकीला चित्रपट मिळणे बंद झाले होते तेव्हा चंकीने बांगलादेशी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्याचा प्रत्येक चित्रपट तेथे हिट होताना दिसत होता.
चंकी पांडेने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी स्वत:चे नाव बदलले. त्याचे खरे नाव सुयश शरद पांडे आहे. चित्रपटांमध्ये अधूनमधून दिसणारा चंकी पांडे, पत्नी भावनासोबत मुंबईत रेस्टॉरंटही चालवतो. 'द एल्बो रूम' नावाचे त्याचे आलिशान रेस्टॉरंट मुंबईच्या खार पश्चिम भागात आहे. त्याची स्वतःची बॉलिवूड इलेक्ट्रिक नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी देखील आहे.
९०च्या दशकात चंकी पांडेचा अतिशय खराब काळ सुरु होता. एक वेळ तर अशी आली होती की, चंकी पांडेच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. आपल्या कारकिर्दीचे बुडणारे जहाज वाचवण्यासाठी चंकी पांडे अखेर बांगलादेशी चित्रपटांकडे वळला. स्थानिक भाषा माहीत नसतानाही त्याने बांगलादेशात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बांगलादेशी चित्रपटसृष्टीत 'स्वामी केनो असामी', 'बेश कोरेची प्रेम कोरेची', 'मेयरा ए मानुष' असे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणाऱ्या चंकी पांडेला ‘बांगलादेशी शाहरुख खान’ म्हटले जाते.
वाचा: बाईsssss तुझा माझ्यावर विश्वास नाही का?; अभिजीतने केली निक्कीची नक्कल
बांगलादेशमध्ये आपली छाप पाडल्यानंतर चंकी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतला होता. २००३ मध्ये 'कयामत' या चित्रपटातून त्याने पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर त्याने 'पेइंग गेस्ट', 'हाऊसफुल', 'हाऊसफुल २', 'बुलेट राजा', 'बेगमजान' सारखे दमदार चित्रपट केले.