बॉलिवूडमधील अतिशय देखणा अभिनेता म्हणून आदित्य पंचोली ओळखला जातो. आज ४ जानेवारी त्याचा वाढदिवस आहे. तो कुटुंबीयांसोबत त्याचा ५९वा वाढदिवस साजरा करणार आहे. आदित्य हा त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. केवळ चित्रपटच नाही, तर टीव्ही जगतातलाही तो एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याचे नाव अभिनेत्री कंगना रणौतसोबत जोडले गेले होते. आज आदित्यचा वाढदिवस असल्यामुळे जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
बॉलिवूड चित्रपटांमध्ये व्हिलन साकारून ‘बॅडबॉय’ अशी प्रतिमा निर्माण करणारा आदित्य पांचोली खऱ्या आयुष्यातही अनेकदा मोठ्या वादांमध्ये अडकला आहे. अभिनेता आदित्य पांचोली याचा जन्म ४ जानेवारी १९६५ रोजी मुंबईत झाला. त्याचे वडील राजन पांचोली हे चित्रपट दिग्दर्शक होते. घरातच फिल्मी वातावरण असल्याने साहजिकच आदित्यची पावलं देखील मनोरंजन विश्वाकडे वळली. आदित्यने १९८६मध्ये 'सस्ती दुल्हन और महंगा दुल्हा' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये झळकला होता. पण, चित्रपटाचा नायक म्हणून तो स्वतःची विशेष ओळख निर्माण करू शकला नाही.
१९९०मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित 'जख्मी जमीन' या चित्रपटाने आदित्य पांचोलीला चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली. यानंतर आदित्य अनेक चित्रपटांमध्ये झळकला. चित्रपटांमध्ये खलनायक बनून आदित्य पंचोलीने प्रसिद्धी मिळवली. 'अव्वल नंबर', 'जंग', 'खिलोना', 'येस बॉस', 'हमेशा' आणि 'ये दिल आशिकाना'मध्ये त्याने साकारलेला ‘व्हिलन’ अधिक गाजला.
आदित्य पांचोलीने त्याच्यापेक्षा तब्बल ६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री झरीना वहाबशी लग्न केले आहे. दोघांची भेट 'कलंक का टीका' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. मात्र, विवाहित असताना देखील आदित्य पंचोलीचे नाव कंगना रनौतशी जोडले गेले होते. जेव्हा कंगना रनौत बॉलिवूड स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत होती, तेव्हा तिचे नाव आदित्य पांचोलीसोबत जोडले गेले होते. पण आदित्यच्या वागणूकीमुळे त्यांचे नाते संपले. एका कार्यक्रमात कंगनाने आदित्यवर आरोप केला होता की त्याने भर रस्त्यात तिच्यावर हात उचलला. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुंफली होती.
संबंधित बातम्या