बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरचा ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस आहे. कपिल शर्मा आज त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. अवघ्या काही वर्षांतच कपिल शर्मा याने स्वतःच्या नावालाच एक ब्रँड बनवले आहे. कपिलचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मुळे संपूर्ण भारत त्याच्यासोबत खळखळून हसला. कपिल शर्माच्या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, बॉलिवूडचे बडे सेलेब्रिटीही त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावतात.
अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मा हा मूळचा अमृतसरचा रहिवासी आहे. जेव्हा कपिल शर्माने इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल सुरू केला, तेव्हा इंडस्ट्रीत त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता. शून्यातून प्रवास सुरू करून कपिलने इथवर पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि कॉमेडीच्या जगावर राज्य करायला सुरुवात केली. कपिल शर्मा आजघडीला प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. पण, सुरुवातीच्या काळात तो एका छोट्याशा घरात राहत होता. आज जरी तो आलिशान आयुष्य जगत असला, तरी पण एक काळ असा होता की, त्यांच्य गावातील लोक त्यांना ओळखत दाखवत नव्हते.
मुंबईत येऊन सेलिब्रिटी होण्यापूर्वी कपिल शर्माने थिएटर आर्टिस्ट म्हणून बराच काळ संघर्ष केला आहे. तो दहावीत असताना उदरनिर्वाहाच्या पैशासाठी पीसीओमध्ये काम करायचा. एवढेच नाही, तर घर चालवण्यासाठी कपिल दुपट्टेही विकायचा. त्यावेळी त्याच्या वडिलांची तब्येत खूपच खराब होती, त्यामुळे घरात पैशांची चणचण होती. या कारणास्तव त्याला लहान वयातच नोकरी सुरू करावी लागली. शाळेची फी भरण्यासाठी त्याने पीसीओ आणि कपड्याच्या दुकानात काम केले.
कपिल शर्माने पहिल्यांदा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये भाग घेतला होता. पण, अमृतसरमधील ऑडिशनमध्येच तो बाहेर पडला. पण, कपिल शर्माने हार मानली नाही आणि तो पुन्हा अमृतसरहून दिल्लीला आला आणि त्याने पुन्हा ऑडिशन दिली. यावेळी कपिल शर्माची निवड तर झालीच, पण 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' सीझन तीनचे विजेतेपदही त्याने पटकावले. अमृतसरच्या कपिल शर्माने सुरुवातीच्या काळात कपड्याच्या दुकानात काम केले असेल, पण आज कपिल अतिशय विलासी जीवन जगत आहे. त्याने अलीकडेच पंजाबमध्ये एक आलिशान फार्महाऊस खरेदी केले आहे. या फार्म हाऊसच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. या बंगल्याची किंमत २५ कोटी रुपये आहे. याशिवाय कपिलने मुंबईत स्वत:साठी एक आलिशान अपार्टमेंटही खरेदी केला आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल १५ कोटी रुपये आहे.