Hrithik Roshan Birthday: बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशन आज म्हणजेच १० जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा हृतिकने २०००मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. त्याचा हा चित्रपट खूप हिट ठरला होता. इतकंच नाही तर, या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. आज हृतिक केवळ त्याच्या फिटनेस आणि डान्सिंग स्टाइलसाठी ओळखला जात नाही, तर तो जगातील सर्वात देखणा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो.
मात्र, फार कमी लोकांना माहिती असेल की, बॉलिवूडचा हा सुपरस्टार लहानपणी एका गंभीर समस्येशी झुंज देत होता. हृतिकला लहानपणी अडखळत बोलण्याचा त्रास होता. त्यामुळे त्याला स्वतःचे नाव देखील नीट संगत यायचे नाही. इतर शब्दही तो नीट बोलू शकत नव्हता. हा त्रास त्याला अनेक वर्षे सतावत होता आणि या काळात शाळेतील इतर मुलेही त्याची चेष्टा करत असतं. याला शाळेतील मुलं हकल्या म्हणून चिडवायचे. खुद्द हृतिकने २००९मध्ये फराह खानच्या शो 'तेरे मेरे बीच में'मध्ये याचा खुलासा केला होता. वयाच्या ६व्या वर्षापासून त्याला हा आजार झाला होता. यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाल्याचे त्याने सांगितले होते. यामुळे तो शाळेत जाण्यास घाबरायच आणि टाळाटाळ करायचा. कारण शाळेतील मुले त्याची चेष्टा करत असत.
हृतिकने सांगितले की, त्याचे वडील राकेश रोशन देखील याच कारणामुळे त्याच्यावर रागावले होते. आपल्या मुलाला नीट बोलता यावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु या समस्येमुळे हृतिकला अनेकवेळा त्यांचे टोमणे ऐकावे लागले. अभिनेता होण्याचे त्याचे स्वप्न काहीवेळा या आजारामुळे अपुरेच राहील का, असे वाटायचे. कारण, त्याला चित्रपटांच्या स्क्रिप्टही नीट वाचता येत नव्हत्या.
मात्र, हृतिकने हार मानली नाही आणि आपल्या आयुष्यातील या मोठ्या समस्येवर त्याने तोडगा शोधून काढला. त्याने स्पीच थेरपी घेतली आणि हळूहळू या समस्येवर मात केली. वयाच्या ३५व्या वर्षापर्यंत तो या आजाराशी झगडत राहिला, पण उपचारानंतर त्याची यातून सुटका झाली. यानंतर त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक नवी ऊर्जा आली आणि तो आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करू शकला.