मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

May 18, 2024 07:42 AM IST

केवळ मराठी मनोरंजन विश्वातच नव्हे, तर ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न’ यासारख्या हिंदी चित्रपटांमधूनही सोनालीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट?
‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट?

मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस आहे. सोनाली कुलकर्णी हिचा जन्म १८ मे १९८८ रोजी पुण्यात झाला. ‘गाढवाचं लग्न’, ‘अजिंठा’, ‘समुद्र’, ‘इरादा पक्का’, ‘मितवा’, ‘रमा माधव’, ‘शटर’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘हिरकणी’, ‘विक्की वेलिंगकर’ अशा धडाकेबाज मराठी चित्रपटांतून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. केवळ मराठी मनोरंजन विश्वातच नव्हे, तर ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न’ यासारख्या हिंदी चित्रपटांमधूनही सोनालीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. सोनाली कुलकर्णी हिची आई पंजाबी आणि वडील मराठी असून, तिच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. आई वडील दोघेही लष्करात कार्यरत होते. मात्र, सोनालीने अभिनयक्षेत्र निवडून या इंडस्ट्रीत मोठा पल्ला गाठला आहे. परंतु, तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

ट्रेंडिंग न्यूज

आई वडील लष्करात असल्यानं सोनाली कुलकर्णीचा जन्म एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झाला होता. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. तर, आई देखील तिथेच नोकरी करत होती. लष्करी पार्श्वभूमीमुळेच बिनधास्तपणा माझ्यात लहानपणापासूनच होता, असं सोनाली नेहमी म्हणते. सोनालीचे शिक्षण हे आर्मी स्कूल केंद्रीय विद्यालयातूनच पूर्ण झाले आहे. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात पदवी प्राप्त केली. अर्थात अभिनेत्री असण्यापूर्वी सोनाली कुलकर्णी एक पत्रकार आहे. यानंतर तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ टेलिव्हिजन अँड फिल्म प्रोडक्शन या विषयावर पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

धड मराठी बोलता येत नव्हतं!

सोनाली कुलकर्णी हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. जिथे कुठे संधी मिळेल तिथे, आवर्जून नाटक आणि डान्समध्ये सहभागी व्हायची. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिने कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून भाग घेतला. २००५मध्ये तिने एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि ती पहिली रनर अप ठरली. या सौंदर्य स्पर्धेनंतर तिने काही जाहिराती आणि रॅम्प शो केले. सैनिकी पार्श्वभूमी असल्याने सोनाली कुलकर्णीला नीट मराठी देखील बोलता येतं नव्हतं. सोनालीला एसटीआयआयमधील एका माहितीपटाच्या शूटिंगसाठी कॅमेरासमोर उभे राहावं लागलं आणि तिथून तिच्या अभिनयाला सुरुवात झाली.

असा मिळाला पहिला चित्रपट

वडील मराठी आणि आई पंजाबी असल्याने घरात पहिल्यापासूनच हिंदी बोलली जात होती. त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी सोनाली कुलकर्णी हिला नीट मराठी बोलता येत नव्हतं. मात्र, ई टीव्ही मराठीवरील ‘हा खेळ संचिताचा’ ही पहिली मालिका मिळताच सोनाली कुलकर्णीने मराठी शिकायला सुरुवात केली होती. ‘हा खेळ संचिताचा’ ही मालिका सुरू असताना त्याच मालिकेच्या सेटवर सोनालीला तिचा पहिला चित्रपट मिळाला. ‘गाढवाचं लग्न’ हा सोनाली कुलकर्णी हिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात तिची भूमिका लहान असली, तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी होती. या चित्रपटातील तिची भूमिका पाहून केदार शिंदे यांनी तिला ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका देऊ केली. या पहिल्या चित्रपटातील तिच्या अभिनयाला राज्य पुरस्कारही मिळाला आणि इथूनच खऱ्या अर्थाने तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात झाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४