बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना आज त्याचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'दिल चाहता है'चा 'सिड'असो किंवा 'ताल'चा 'मानव मेहता' असो, या अभिनेत्याने प्रत्येक भूमिकेतून स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. मीडियापासून दूर राहणाऱ्या अक्षयचा स्वभाव अतिशय शांत आणि संयमी आहे. पण, एक काळ असा होता की, अक्षय खन्नाने त्याचा आत्मविश्वास गमावला होता. यामागे त्याचे गळणारे केस आणि अकाली पडलेले टक्कल हे कारण होते.
२००७मध्ये ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सहभागी झालेल्या अक्षय खन्नाने म्हटले होते की, सुरुवातीला मी टक्कल पडणे आणि केस गळणे याकडे दुर्लक्ष केले होते. पण १० वर्षांनंतर, त्याने आपल्यामध्ये किती फरक पडला हे उघड केले. या टक्कल पडण्याचामुले आपल्यावर आणि आपल्या करिअरवर किती परिणाम झाला आहे, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही, असे तो म्हणाला. खुद्द अक्षयला हे मान्य करायला दहा वर्षे लागली. अभिनेता म्हणाला, ‘याची सुरुवात अगदी लहान वयात झाली होती. माझ्यासाठी अकाली टक्कल पडणे म्हणजे पियानोवादकाची बोटे गमावल्यासारखे होते. त्या दिवसांत मला खरंच तसं वाटलं होतं...जसं घडत होतं. तसं मी याकडे फार कमी लक्ष देत होतो. नंतर यामागची तीव्रता कळली.'
अक्षय पुढे म्हणाला होता की, ‘अभिनेता म्हणून आपण कसे दिसतो, हे खूप महत्वाचे आहे. वयाच्या १९-२०मध्ये असे टक्कल पडणे सर्वात निराशाजनक आहे. मी वैतागलो होतो. माझे हृदय तुटले. ते मानसिकदृष्ट्या खचलो होतो. ही भावना तुमचा जीवही घेऊ शकते. या टक्कल पडण्यामुळे मी माझा आत्मविश्वास गमावला होता. एक तरुण अभिनेता म्हणून मी माझा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला होता. हे मला मान्य करण्यापेक्षा जास्त त्रास झाला.’
अक्षय खन्ना हा दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. अक्षयने ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण, लवकरच त्याला टक्कल पडू लागले होते. यानंतर अभिनेत्याने दोन वर्षांचा ब्रेक घेतला. पण, त्यानंतर २००१मध्ये त्याने ‘दिल चाहता है’ या चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन केले. अक्षयच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. २०१२मध्ये त्याने चार वर्षांचा ब्रेक घेतला आणि नंतर ‘ढिशूम’मधून पुनरागमन केले. अक्षय शेवट 'दृश्यम २' मध्ये दिसला होता.
संबंधित बातम्या