बॉलिवूडचे ‘जम्पिंग जॅक’ अर्थात अभिनेते जितेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. रवी कपूर म्हणजे सगळ्यांचे लाडके अभिनेते जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे पंजाबी खत्री कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरनाथ आणि काका कृष्णा कपूर यांनी मुंबईत दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला होता. ते चित्रपटांसाठी फिल्म इंडस्ट्रीला ज्वेलरी पुरवण्याचे काम करायचे. जितेंद्र यांनी मुंबईतूनच शिक्षण घेतले होते. महाविद्यालयीन काळात त्यांचे वर्गमित्र राजेश खन्ना होते. सुरुवातीपासूनच जितेंद्र यांचा कल चित्रपटांकडे होता आणि अनेकदा ते दागिने द्यायला जायचे, तेव्हा त्यांच्या मनात अभिनयाचा विचार यायचा.
खुद्द अभिनेता जितेंद्र यांनी आपल्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. जितेंद्र हे व्ही. शांताराम यांचे चाहते होते आणि त्यांना एकदा भेटायचे होते. पण, त्यावेळी त्यांना कुणीही मदत केली नाही. चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या जितेंद्र यांना एकदा व्ही. शांताराम यांच्या ‘सेहरा’ या चित्रपटासाठी ऑडिशन सुरू असल्याचे कळले. त्यांनी त्यांचे मित्र राजेश खन्ना यांच्याकडून ऑडिशनचे प्रशिक्षण घेतले. कारण, राजेश खन्ना त्यावेळी थिएटर करायचे. थोडसे ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा जितेंद्र व्ही शांताराम यांच्या स्टुडिओत गेले, तेव्हा त्याला कळलं की तिथे नायिकेच्या बॉडी डबलचं शूटिंग होतंय आणि जितेंद्र चक्क त्यात फिट झाले.
कपिल शर्माच्या शोमध्ये जितेंद्र यांनी हा किस्सा सांगितला होता. जितेंद्रने अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले. अखेर तो दिवस आला, ज्याची जितेंद्र वाट पाहत होते. व्ही शांताराम यांनी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून चित्रपटाची ऑफर दिली. जितेंद्रसाठी हा जॅकपॉट होता. त्यांनी स्क्रिप्ट न वाचता किंवा भूमिका न ऐकतच थेट हो म्हटलं. या चित्रपटासाठी व्ही. शांताराम यांनी रवी कपूरचे नाव बदलून जितेंद्र ठेवले आणि पडद्यावर त्यांची ओळख जितेंद्र म्हणून निर्माण केली.
जितेंद्र यांचा ‘गीत गाया पत्थरों ने’ हा चित्रपट आला आणि सुपरहिट झाला. यानंतर जितेंद्र यांनी व्ही. शांताराम यांचा दुसरा चित्रपट ‘फर्ज’ केला आणि तोही हिट झाला. यानंतर, जितेंद्रने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ६०च्या दशकात, या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत एंट्री केली. जितेंद्र चांगला अभिनय तर करतच होते. मात्र, सोबतच ते चांगले नृत्य देखील करत होते. जितेंद्र यांनी १९६४मध्ये आलेल्या 'गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर 'फर्ज', 'हमजोली', 'जीने की राह', 'तोहफा', 'हिम्मतवाला', 'धरम-वीर', 'औलाद', 'हातीम ताई', 'आशा', 'जानी दुश्मन', 'परिचय', 'खुशबू', 'संजोग', 'एक ही भूल', 'घर संसार' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.