सध्याच्या बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून कार्तिक आर्यन ओळखला जातो. तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. नुकताच कार्तिकचा 'भुल भुलैय्या ३' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज, २२ नोव्हेंबर रोजी कार्तिक आर्यनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी.
कार्तिकचा जन्म २२ नोव्हेंबर १९९० रोजी मध्य प्रदेशातील ग्वालियारमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच कार्तिकला अभिनयाची आवड होती. मात्र, ही गोष्ट त्याने घरातल्यांपासून नेहमीच लपवून ठेवली. अभिनयविश्वात काम करण्यासाठी कार्तिकने मुंबई गाठली. पण, या गोष्टी घरातल्यांपासून लपवण्यासाठी त्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कॉलेजमध्ये असतानाच त्याने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती.
इंजिनिअरिंग करत असतानाच कार्तिक अनेक ठिकाणी ऑडिशन देत होता. कार्तिकचं कॉलेज नवी मुंबईत होतं. याच्या जवळपासच तो एका शेअरिंग रूममध्ये राहत होता. या छोट्याशा घरात तब्बल १२ लोकांसोबत तो राहत होता. या ठिकाणाहून सतत मुंबईला येण्यासाठी त्याच्या खिशात फारसे पैसे देखील नसायचे. अशावेळी कार्तिक नवी मुंबई ते मुंबई हा लोकल प्रवास विना तिकीट करायचा. ट्रेनचं तिकीट देखील त्यावेळी त्याला खूप महाग वाटत होतं. दररोजची पायपीट करून तो स्टुडिओंमध्ये जात होता. मात्र, सतत तीन वर्ष त्याच्या पदरी निराशाच पडली.
कार्तिक आर्यनने २०११ साली आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट मिळवण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. या चित्रपटात त्याने रजत नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने ५ मिनिटाचा मोनोलॉग सादर केला होता. या मोनोलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. तसेच चित्रपट देखील हिट होताना दिसला. लहान बॅनरचे चित्रपट करून कार्तिकने स्वतःच्या अभिनयामुळे इंडस्ट्रीत स्थान मिळवलंय. त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘भूल भुलैया ३’ हा यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे.
वाचा: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
कार्तिकला सर्वजण कार्तिक आर्यन या नावाने ओळखतात. पण त्याचे आडनाव आर्यन नाही. कार्तिकचे खरे नाव कार्तिक तिवारी असे आहे. कार्तिकच्या कुटुंबात आई, वडील आणि बहीण सर्वजण डॉक्टर आहेत. त्यामुळे कार्तिकनेही डॉक्टर व्हावं, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण पालकांच्या इच्छेविरुद्ध कार्तिकने मेडिकल क्षेत्रात न जाता त्याने इंजिनिअरींग केलं. नंतर त्यातही करिअर करायचं सोडून त्याने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर आता कार्तिक बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणून ओळखला जातो.