बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपट निर्माता परिवाराचा बॅनर असलेल्या ‘यशराज फिल्म्स’ने आजवर अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. पण, यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा वडिलांच्याही दोन पावले पुढे गेला. आदित्य चोप्रानेही आपल्या चित्रपटांचा बॅनर आणखी वाढवला आणि अनेक हिट चित्रपट दिले. आदित्य चोप्रा आज त्याचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे. आदित्य चोप्राने बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न केले आहे. मात्र, आदित्यचे हे दुसरे लग्न असून, यासाठी त्याला प्रेमाची परीक्षा द्यावी लागली होती.
या लग्नामुळे आदित्य चोप्राला वडील यश चोप्रा आणि आईच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर आदित्यने रागाच्या भरात घर सोडले आणि जवळपास एक वर्ष हॉटेलमध्ये राहिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्रा याने त्याची पहिली पत्नी पायल चोप्रा हिला घटस्फोट दिला होता. यानंतर राणी आणि आदित्य यांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. राणी मुखर्जीने २१ एप्रिल २०१४ रोजी आदित्य चोप्रासोबत लग्न केले. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राचे वडील यश चोप्रा आणि आई पामेला या त्याच्या राणी मुखर्जीसोबत लग्न करण्याच्या विरोधात होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश चोप्रा आपल्या मुलाचे पहिले लग्न मोडण्याच्या विरोधात होते. आदित्य आणि पायलच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात खूप तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आदित्य चोप्राने पायलला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे वडील यश चोप्रा यामुळे खूप नाराज झाले होते. इतकेच नाही, तर यश चोप्रा यांना मुलगा आदित्यची पहिली पत्नी पायल जास्त पसंत होती आणि ते या घटस्फोटाच्या विरोधात होते, असेही म्हटले जाते.
आदित्य चोप्राच्या घटस्फोटाचे कारणही राणीसोबतचे प्रेमसबंध सांगण्यात येत होते. हे कानावर पडल्यानंतर यश चोप्रा यांनी लेक आदित्यला थेट घर सोडण्यास सांगितले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळीआदित्य चोप्राने आपले घर सोडले आणि जवळपास एक वर्ष तो हॉटेलमध्ये राहत होता. यानंतर आदित्यच्या आईने त्याचे आणि वडील यश चोप्रा यांच्यातील संबंध पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले.
आदित्य चोप्राने १९९५ साली'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करिअरला सुरुवात केली. आदित्यने त्याच्या पहिल्याच चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती. आदित्यचा पहिला सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलची जोडीही खूप गाजली होती. यानंतर आदित्य चोप्राने ५०हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यासोबतच त्याने ‘रब ने बना दी जोडी’, ‘मोहब्बतें’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
संबंधित बातम्या