'द काश्मीर फाइल्स'ची ‘राधिका मेनन’ म्हणजेच अभिनेत्री पल्लवी जोशी हिला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एक यशस्वी अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबतच, ती एक चित्रपट निर्माती देखील आहे. ४ एप्रिल १९६९ रोजी जन्मलेली पल्लवी आज तिचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. लहानपणापासूनच मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या या अभिनेत्रीने रंगभूमीवरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अभिनयाच्या बळावर तिने आज हे स्थान गाठले आहे. मात्र, तिचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी आली की, पल्लवीचा दिग्दर्शकाने जाहीर अपमान केला होता. मात्र, तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या दिग्दर्शकाची बोलती बंद झाली होती.
पल्लवी जोशीने 'बदला' आणि 'आदमी सडक का' सारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर तिच्याकडे 'पनाह', 'तहलका' आणि 'सौदागर'सह अनेक चित्रपट आले, ज्यामध्ये काम करताना अभिनेत्रीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पल्लवी ९०च्या दशकात अनेक टीव्ही शोमध्येही दिसली होती. २०२२मध्ये तिचा 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशीचे पती विवेक अग्निहोत्री यांनी केली होती.
'द कश्मीर फाइल्स'नंतर पल्लवी जोशी 'द वॅक्सीन वॉर'मध्ये दिसली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपले सुरुवातीचे दिवस आठवत असताना, तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, अनेक वर्षांपूर्वी एका दिग्दर्शकाने सेटवर तिचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान केला होता. यावेळी बोलताना पल्लवी म्हणाली होती की, 'मला एका दिग्दर्शकासोबत काम करताना खूप त्रास झाला होता. त्याला माझा मेकअप, केस, स्टाईल आणि माझा अभिनयही आवडला नव्हता. सेटवर तो नेहमी मला घालूनपाडून बोलायचा आणि अपमान करायचा.’
पुढे अभिनेत्री म्हणाली की, 'त्या दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, मला अभिनय कसा करावा हे माहित नव्हते. तो मला सतत म्हणायचा की, मी चांगली अभिनेत्री नाही. मी खूप वाईट सीन दिले आहेत. सुरुवातीला मला वाटले की, हा सगळा गंमतीचा भाग आहे. पण, नंतर मला समजले की, तो माझा अपमान करत आहे. त्याचे बोलणे ऐकून मला सेटवरच रडू यायचे. त्यावेळी माझ्या मनात अभिनय सोडण्याचे विचार यायचे.’ पल्लवी जोशी म्हणाली की, ‘दिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने ती पूर्णपणे खचून गेली होती. पण या घटनेनंतर तीन वर्षांनी म्हणजे १९९४मध्ये तिने 'वो छोकरी' हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिंकल्याने तिला खात्री पटली की, ती चांगला अभिनय करू शकते. इतकेच नाही तर,तिचा अपमान केलेल्या त्या दिग्दर्शकाचे तोंड देखील आता बंद झाले होते.