टीव्हीपासून ते चित्रपट आणि ओटीटीपर्यंत विक्रांत मेस्सीने आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. त्याने प्रत्येक पात्र इतक्या ताकदीने साकारले आहे की, त्याच्या पडद्यावर येण्यानेच वेगळी जादू निर्माण होते. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘12th Fail’ चित्रपटामुळे त्याच्या कारकिर्दीला एक वेगळी भरारी मिळाली. या चित्रपटासाठी विक्रांतचे खूप कौतुक झाले. विक्रांतने यापूर्वीही अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. विक्रांतची गणना आता बॉलिवूडच्या टॉप स्टार्समध्ये केली जाते. मात्र, त्याचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.
विक्रांत मेस्सी हा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसलेल्या एका विश्वातून आला आहे. त्यामुळे हा प्रवास त्याच्यासाठी थोडा कठीण होता. विक्रांतने चित्रपटात काम करण्यापूर्वी नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. २००७मध्ये विक्रांत मेस्सीने एका डान्सिंग रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. मात्र, या शोनंतर विक्रांतला फारशी ओळख मिळाली नाही. या शोनंतर विक्रांत 'धरम वीर', 'बालिका वधू' आणि 'गुमराह' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसला. यानंतर विक्रांतच्या हातात ‘लुटेरा’ चित्रपट आला आणि त्याची इथवरची मेहनत फळाला आली.
जेव्हा विक्रांत मेस्सी टीव्हीवर काम करत होता, तेव्हा त्याला एका महिन्यात चार एपिसोड शूट करावे लागायचे आणि प्रत्येक एपिसोडसाठी त्याला ६००० रुपये मिळायचे. पहिल्यांदा ही ऑफर ऐकल्यावर विक्रांतने लगेच हिशोब केला आणि आपल्याला २४ हजार रुपये प्रति महिना मिळणार या विचारानेच त्याने या ऑफरला लगेचच होकार दिला. मात्र, ही ऑफर पैशासाठी नाही तर शिकण्याच्या इच्छेने स्वीकारल्याचे विक्रांतने सांगितले होते.
अभिनेता विक्रांत मेस्सी याने ‘लुटेरा’नंतर अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे. विक्रांत मेस्सीने दीपिका पदुकोणसोबत ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचेही खूप कौतुक झाले. याशिवाय विक्रांत मेस्सीला सर्वात लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’मधूनही विशेष ओळख मिळाली. ही मालिका हिट झाल्यानंतर विक्रांतची कारकीर्दही उंचावू लागली. विक्रांतने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये दमदार अभिनय कौशल्य दाखवले आहे. तापसी पन्नूसोबतच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात देखील विक्रांत मेस्सी याने दमदार भूमिका साकारली होती.