Bigg Boss OTT 3 Latest Update: 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये वीकेंड का वार पूर्वी चांगलाच धमाका पाहायला मिळत आहे. यावेळी अनिल कपूरही फुल फॉर्ममध्ये दिसला आहे. शोच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील आणखी एक सदस्य बेघर झाला आहे. नुकताच टॅरो कार्ड रीडर मुनीषा खटवानीचा या शोमधील प्रवास संपुष्टात आला आहे. एकीकडे मुनीषा बाहेर गेल्याने कुटुंबीय नाराज होते. तर, दुसरीकडे पायल मलिकने घरात येऊन कृतिकावर कमेंट करणाऱ्या विशाल पांडेवर जोरदार टीका केली. पत्नीसाठी अशा गोष्टी ऐकून अरमानचा रागही अनावर झाला आणि त्याने विशालला जोरदार थप्पड मारली. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पायल मलिकने नुकतीच 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये प्रवेश केला. विशालचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठीच ती घरात आली होती. अलीकडेच विशालने लवकेश कटारियाला कृतिक मलिक आवडल्याबद्दल सांगितले होते, हे ऐकून पायलचा पारा एकदम चढला होता. ‘विकेंड के वार’मध्ये अनिल कपूरसमोर तिने विशालला संपूर्ण सत्य सांगण्यास सांगितले. 'भाभी अच्छी लगते हैं' याचा अर्थ वेगळा होता, असे विशालने वारंवार स्पष्ट केले. माझा हेतू चुकीचा नव्हता, हे देखील तो वारंवार म्हणताना दिसला. तुझा हेतू चुकीचा नव्हता, तर लवकेशच्या कानात असं का बोललास, असं म्हणत अनिल कपूर संतापले. यावर विशालकडे उत्तर नव्हते.
‘वीकेंड का वार’नंतर घरातील संपूर्ण वातावरण तापलं आहे. अरमान मलिकचा विशालबद्दलचा राग सध्या खूप वाढला आहे. अरमानने विशालला म्हटले की, 'तुझी सवय आधीपासूनच अशी आहे?’ यावर विशाल म्हणाला की, 'त्यावेळी मी असं काही बोललो नव्हतो.’ हे ऐकताच अरमान लव कटारियाला म्हणतो, 'आज त्याने माझ्या पत्नीबद्दल असे म्हटले, उद्या तो तुझ्या घरच्यांसाठी बोलेल.’
अरमानने लवला विचारले की तो तुझ्या कानात काय बोलला? यावर लव कटारिया म्हणाला की, 'विशाल माझ्या कानात म्हणाला की, भाभी छान दिसतेय.’ हे ऐकल्यानंतर अरमानचा आपल्या रागावरचा ताबा सुटतो आणि तो विशालला जोरदार थप्पड मारतो. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य त्या दोघांची हाणामारी थांबवण्यासाठी पुढे सरसावले. अरमानच्या या कृत्यामुळे विशालही खूप संतापलेला दिसत होता.