Suraj Chavan: ट्रॅक्टर चालवतोय, गुरांचा सांभाळ करतोय; सूरज चव्हाणच्या साधेपणाचं होतंय कौतुक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suraj Chavan: ट्रॅक्टर चालवतोय, गुरांचा सांभाळ करतोय; सूरज चव्हाणच्या साधेपणाचं होतंय कौतुक

Suraj Chavan: ट्रॅक्टर चालवतोय, गुरांचा सांभाळ करतोय; सूरज चव्हाणच्या साधेपणाचं होतंय कौतुक

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 31, 2024 08:34 AM IST

Suraj Chavan Video : सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ५चा विजेता सूरज चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्याचा साधेपणापाहून सर्वांनी कौतुक केले आहे.

Suraj Chavan
Suraj Chavan

Suraj Chavan Video : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रचंड गाजला. यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर रील स्टार सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस मराठी’ची मानाची ट्रॉफी बारामतीच्या सूरज चव्हाणने पटकावली. बिग बॉसच्या घरातील सूरजचे वागणे पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले होते. आता गावाकडे राहात असलेल्या सूरजचा साधेपणा पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.

बिग बॉसची ट्रॉफी जिंकून गावाकडे गेलेल्या सूरजला भेटण्यासाठी अनेकजण येत आहेत. प्रत्येकजण त्याला काही ना काही भेटवस्तू देताना दिसत आहेत. हा रिऍलिटी शो संपल्यानंतर आता सूरज पुन्हा एकदा कामावर परतला आहे. सोशल मीडियावर सूरज व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. त्याची डायलॉगबाजी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. मूळचा बारामती मोडवे गावातील असलेल्या सूरजचं त्याच्या गावावर अधिक प्रेम आहे. इतकंच नाही तर गावाकडच्या राहणीमानात सूरज खूप आनंदी राहतो.

काय आहे व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर सूरजचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सूरज गावाकडे आनंदी असल्याचे दिसत आहे. तसेच तो नेहमीच्या कामाला देखील लागला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज गावच्या शेतात रमल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणने गावाकडच्या शेतात फेरफटका मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो ट्रॅक्टर चालवत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज गुरांना चरायला शेतात घेऊन जातानाही दिसत आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुक

सोशल मीडियावर सूरजचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत त्याच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. “सूरज भाऊने ट्रॅक्टरवर व्हिडीओ काढला”, “सूरज स्टाइल एक नंबर”, “खरंच हिरो वाटतो सूरज दादा” अशा अनेक कमेंट व्हिडीओवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य

सूरजला आल्या चित्रपटांच्या ऑफर

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. त्याचा काही दिवसांपूर्वी राजा राणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतर आता ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सूरजला बरोबर घेऊन ‘झापुक झुपूक’ सिनेमा देखील बनवणार आहेत.

Whats_app_banner