'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहेत. कलाकारांसोबतच या शोमध्ये काही किएटर्स देखील सहभागी झाले आहेत. त्यामधील सूरज चव्हाण हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकदम छोट्या गावातून आलेले, दुनियादारी फारशी माहिती नसली तरी माणसं समजणाऱ्या सूरजने बिग बॉसच्या घरात धूमाकूळ घातला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सूरजचे तोंडभरुन कौतुक करताना दिसणार आहे.
'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत रितेश म्हणतोय,"या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली."
रितेश पुढे म्हणतो,"झुंड में भेडिये आते हैं शेर अकेला ही आता है... तीन आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवीदेखील घाबरलेल्या दिसून आल्या होत्या. कोणालाही कमी लेखू नये. हे या आठवड्यात सिद्ध झालं आहे. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका". तसेच यापुढे बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेश सूरजला देताना दिसणार आहे."
वाचा: सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! टास्कमध्ये थेट अरबाजला भिडला
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.