गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बिग बॉस मराठी' सिझन पाच हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. यावेळी या शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ऐवजी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसत आहे. दर रविवारी बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक बाहेर पडतो. आता अंकिता वालावलकरचा घरातील प्रवास संपला असल्याचे समोर आले आहे.
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात 'कोकण हार्टेड गर्ल' सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा 'बिग बॉस मराठी'मधला प्रवास आता संपला आहे. बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीने 'बिग बॉस मराठी'चा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे, "या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे अंकिता." त्यानंतर अंकिता बिग बॉसच्या घरातील तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत.
'बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. या आठवड्यात ती घराबाहेर पडेल असे कोणालाही वाटले नव्हते.
वाचा: 'बिग बॉस'च्या घरात अरबाजने आखला मोठा डाव, भाऊच्या धक्क्यावर होणार उघड
बिग बॉस मराठी ५मध्ये वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निक्की तंबोळी, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, जान्हवी किलेकर, घनःश्याम दरवडे, वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल, आर्या जाधव, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे स्पर्धक दिसत आहेत. आता बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.