“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला-bigg boss marathi season 5 kapil honrao talked suraj chavan should not have win bigg boss on sympathy ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 22, 2024 07:49 PM IST

Bigg Boss Marathi: सध्या बिग बॉस मराठी हा शो चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक सूरज चव्हाण सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकताच एका अभिनेत्याने सूरज चव्हाणसाठी केली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Bigg Boss marathi
Bigg Boss marathi

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालक, घरात वेगवेगळे स्पर्धक या सर्वांमुळे बिग बॉस मराठी सिझन ५ प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता रिल स्टार सूरज चव्हाणची चर्चा रंगली आहे. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणविषयी बाहेर बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, एका अभिनेत्याने सूरजविषयी केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सूरज चव्हाण हा अतिशय गरीब घरातून आला आहे. त्याचा साधेपणा सर्वांना आवडत आहे. अनेक मराठी कलाकारांनी सूरजला पाठिंबा दिला आहे. पण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला मल्हार म्हणजेच अभिनेता कपिला होनरावने सूरजविषयी थोडे वेगळे वक्तव्य केले आहे. त्याने नुकताच ‘मराठी मनोरंजन विश्व’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सूरजचे कौतुक केले आहे.

सूरजला प्रचंड सहानुभूती मिळते

“सुरज चव्हाण आपला माणूस आहे. तो पोरगा भारीच आहे. कमाल आहे. मला त्या पोराच्या बाबतीत खूप सहानुभुती आहे. पण मला असे वाटते की, त्याने अजून स्वतःच्या खेळाच्या बाबतीत बरीच सुधारणा केली पाहिजे. सहानुभूतीच्या जीवावर शो नाही जिंकला पाहिजे. जर तो फक्त सहानुभूतीच्या आधारावर जिंकला तर जे खेळतात ना त्यांचे नुकसान आहे. बाकी काही नाही. सुरजने अजूनही स्वतःची ताकद न घाबरता लावली तर तो जिंकू शकतो. कारण त्याच्याबाबतीत एवढी सहानुभूती आहे” असे कपिल म्हणाला.

अख्ख्या महाराष्ट्रासाठी तो हिरो आहे

पुढे तो म्हणाला, “तो घरातली काम खूप चांगली करतो, ऐकतो. मला तो जास्त कधी आवडला, जेव्हा निक्की त्याला काम लावत होती. माझ्या मेकअपचं सामान घेऊन चल आणि ज्यावेळेस तो बोलला तुझं तू घेऊन जा. ती म्हणाली, मला खाली बसता येत नाहीये. तो म्हणाला, ड्रेस थोडासा मोठा घालं मग. तेव्हा तो मला प्रचंड आवडला. त्या टास्कमध्ये अरबाजबरोबर त्याने जी काही टक्कर घेतली होती, ती कमाल होती. अख्ख्या महाराष्ट्रासाठी तो हिरोच ठरला आहे. पण अजून त्याने चांगलं केलं पाहिजे. कारण तोही शो जिंकू शकतो.”
वाचा: 'बिग बॉस मराठी' फेम सुरज चव्हाणचा गोलीगत दणका! 'राजाराणी' चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा

कोण आहे सूरज चव्हाण?

सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.