छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगतदार ठरत आहे. नुकताच बीबी करन्सीसाठी घरातील स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. त्यासाठी स्पर्धकांना टीम ए आणि टीम बी अशी विभागणी करण्यात आली. टीम एमध्ये निक्की, जान्हवी, वैभव, इरीना, सूरज आहेत. दरम्यान, जान्हवी किल्लेकरने पुन्हा पॅडी कांबळेचा अपमान केला. जान्हवी ही सतत स्पर्धकांचा पाणउतार करत असते. आता शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. या आठवड्यात जान्हवीला चांगलच ट्रोल करण्यात आले आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील जान्हवी किल्लेकरला तिची जागा दाखवली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जान्हवीला म्हणाला, “माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही.” त्यामुळे आजचा भाग अतिशय रंजक ठरणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती, “आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय.” त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावे याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात... तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे."
वाचा: 'तिने जे शब्द वापरले ते चुकीचे', बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून पतीने केली पोस्ट
रितेश भाऊ पुढे म्हणाला, “तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केले. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते.. लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो.” त्यानंतर रितेश दरवाजे उघडण्यास सांगतो. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे.