नृत्य अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी मेघा घाडगे हिने अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी मेघा घाडगे हिच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच, या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. ‘लावणी क्वीन’ बनून मेघा घाडगे हिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. तिच्या लावणी गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.
मेघा घाडगे हिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. मात्र ‘अप्सरा’ हा चित्रपट तिच्यासाठी देखील वेगळा ठरणार आहे. कारण, या चित्रपटात ती साकारत असलेली भूमिका ही अनोखी असून, ती नक्की कोणती आहे? यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. तसेच, आपल्या बहुआयामी भूमिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर नुसत्या आपल्या बोलक्या डोळ्यातून अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विट्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत.
तसेच, या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे, आपल्या रसभरीत गीतातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीतकार मंगेश कांगणे यांनीच आपल्या शब्दांना स्वरबद्ध केले आहे. त्यामुळे मजबूत कथेला कसलेल्या अभिनयाची साथ आणि त्यावर उत्तम संगीताचा तडका अनुभवासाठी प्रेक्षक मायबाप नक्कीच उत्सुक असतील यात शंकाच नाही.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘अप्सरा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप जाहीर केली नसली तरी लवकरच जाहीर होतील.