Abhijeet Kelkar: कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? अभिजीत केळकरनेही पुष्करला सुनावले!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhijeet Kelkar: कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? अभिजीत केळकरनेही पुष्करला सुनावले!

Abhijeet Kelkar: कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? अभिजीत केळकरनेही पुष्करला सुनावले!

Published Jan 30, 2024 12:44 PM IST

Abhijeet Kelkar Letter To Pushkar Jog: अभिनेता अभिजीत केळकर याने सोशल मीडियावरून एक पत्र लिहित पुष्कर जोग याला घरचा आहेर दिला आहे.

Abhijeet Kelkar Letter To Pushkar Jog
Abhijeet Kelkar Letter To Pushkar Jog

Abhijeet Kelkar Letter To Pushkar Jog: सध्या मराठा आरक्षण जात सर्वेक्षणाचे प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. घरोघरी जाऊन जात विचारून प्रश्नोत्तर करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर काही कलाकारांनी टीका केली होती. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने देखील आपला संताप व्यक्त केला होता. मात्र, या दरम्यान त्याची जीभ घसरली आणि काही अपशब्द त्याच्या तोंडून निघाले. यानंतर अनेकांनी पुष्कर जोग याला खडे बोल सुनावले. या प्रकरणी पुष्कर जोग याने जरी माफी मागितली असली तरी, आता ‘बिग बॉस मराठी’तील त्याचा सहस्पर्धक अभिनेता अभिजीत केळकर याने एक पत्र लिहित त्याला काही सवाल केले आहेत.

अभिनेता पुष्कर जोग याने बीएमसी कर्मचाऱ्यांवर टीका करताना ‘त्यांना लाथा घातल्या असत्या’ असे शब्द वापरले होते. यावरच आता अभिजीत केळकर याने सोशल मीडियावरून एक पत्र लिहित पुष्कर जोग याला घरचा आहेर दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये अभिजीत केळकर याने लिहिले की, ‘प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा,तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली. ती सोशल मीडियावर होती, त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच... मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तिच्याबरोबर,तिला आणि तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे, मदत केली आहे. उन्हातान्हात, पावसातसुद्धा फिरून ही कामं करावी लागतात. वरून आदेश आला की, त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं. दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात,ते काही त्यांच्या मनातले नसतात.’

Ketaki Chitale: स्वतःला चित्पावन ब्राह्मण म्हणत बीएमसी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारी केतकी चितळे होतेय ट्रोल!

पुढे त्याने लिहिले की, ‘तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात... १. घरी आलेल्या अशा कर्मचऱ्यांच्या लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटलं नसेल? २. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी,किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही. कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते,कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना? ३. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे,सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे, तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल? (मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे) गेला बाजार,त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे, हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच.. मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील? ४. घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस? तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?’

‘आपण कलाकार आहोत, लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर आणि आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात. आपलं बोलणं, वागणं फॉलो करतात. त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे, तू जे बोललास ते मला फारच लागलं. त्यांचं अतिशय वाईट वाटलं. रागही आला...तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं. त्यामुळे आता तू काय करायला हवं, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील. तुझा मित्र/शुभचिंतक’, असं म्हणत अभिजीत केळकरने आपल्या पत्राची सांगता केली आहे.

Whats_app_banner