‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक हक्काची जागा निर्माण केली आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, गेले काही दिवस या मालिकेने असे भावनिक वळण घेतले की, प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला होता. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाला तेव्हा, आशुतोष केळकर या नव्या पात्राची एन्ट्री झाली होती. या आशुतोष केळकरने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. मात्र, आता या मालिकेत आशुतोषचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. या धक्कादायक वळणामुळे चाहतेच नाही तर काही कलाकार देखील दुःखी झाले आहेत. आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने देखील एक कमेंट करत आपलं दुःख व्यक्त केलं आहे.
‘आशुतोष’च्या एक्झिटनंतर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मधुराणीने आपला सहकलाकार अभिनेता ओमकार गोवर्धन अर्थात ‘आशुतोष केळकर’ याच्या बद्दल या पोस्टमध्ये तिने भरभरून लिहिले. ‘आशुतोषचं 'जाणं' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल....! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच, आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल’, असं मधुराणीने आपल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यावर आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अभिजीत केळकर याने देखील कमेंट केली आहे.
मधुराणी प्रभुलकरच्या या पोस्टवर कमेंट करताना अभिजीत केळकर याने लिहिले की, ‘मी स्वतः एक अभिनेता असूनही मला आशुतोषचं जाणं सहन होत नाहीये किंवा एक्सेप्ट करता येणार नाहीये आणि त्याही पलीकडे जाऊन, ह्यापुढे तुला त्याच्याशिवाय, तसं पाहणं... हे तुमच्या वरचं प्रेम म्हण, सवय म्हण किंवा आणखीन काही...पण त्याचं जाणं म्हणजे जरा कठीणच...’. अभिजीतच्या या कमेंटमुळे तो देखील या मालिकेचा आणि अरुंधती-आशुतोष या जोडीचा चाहता होता, हे प्रेक्षकांना देखील कळले आहे. एकीकडे आशुतोषचा मृत्यू कलाकारांना दुःखद वाटतोय. तर, दुसरीकडे प्रेक्षक देखील या ट्वीस्टवर संतापले आहेत.
‘अशी शॉकिंग वळणं का येतात?’, ‘या ट्वीस्टनंतर मी मालिका पाहणं बंद केलंय’, ‘ही एक चांगली आणि आवडती मालिका होती...आता बघायची इच्छाच नाही... माया ही मनुला नाही, तर आशुतोष ला घेऊन जायला आली होती...’, ‘आता आम्ही आशुतोषला खूप मिस करू’, चाहत्यांच्या अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.