Bigg Boss Marathi Day 59 : 'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांनी आपला खेळदेखील बदलला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेलला घरातून बाहेर पडावे लागले. त्याच्या जाण्याने निक्कीला चांगलाच धक्का बसला. सध्या निक्की बिग बॉसच्या घरात सर्वांवर चिडताना दिसत आहे. दरम्यान आजच्या भागात अभिजीत निक्कीला सुनावताना दिसणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आरडाओरडा करत अभिजितशी भांडत आहे. ती अभिजीतला म्हणतेय, "अभिजीतच्या चाहत्यांची इच्छा होती की तो कॅप्टन बनावा. पण याने अंकिताला बनवले." त्यावर निक्कीला उत्तर देत अभिजीत म्हणतोय, "आमच्यात लोकशाही आहे. तुमच्यात हुकुमशाही होती. तुम्ही खेळातही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय." हे ऐकून निक्कीचा पारा चढतो.
निक्की पुढे म्हणतेय, "हे सगळं करुन तुला मला वाईट ठरवायचं असेल... तर आजपासून माझ्यासोबत बोलू नको." त्यावर आता अभिजित काय उत्तर देणार हे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. आजच्या भागात पुढे नेमकं काय होणार हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन आजपासून आणखी रंगतदार होणार आहे. काही दिवसांतच हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्व सदस्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सिझन पाचची बरीच चर्चा सुरु आहे. घरात होणारे टास्क, स्पर्धकांचे मजेशीर वागणे, वाद-विवाद अशा बऱ्याच गोष्टींची कायम चर्चा सुरु असायची. आता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले लवकरच होणार असल्याची चर्चा रंगली आहे. नेहमी बिग बॉस मराठी हा शो १०० दिवसांचा असतो. पण यावेळी हा शो ७० दिवसात बंद करणार असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नसली तरी सोशल मीडियावर काही इन्स्टाग्राम पेजने याविषयी पोस्ट शेअर केली आहे.