'बिग बॉस मराठी'च्या घरात दर आठवड्याला नवा खेळ आणि नवी समीकरणं पाहायला मिळतात. येणाऱ्या ट्विस्टमुळे अनेकांचा खेळ बदलला आहे. आठवड्यात काहींचा तोंडावरचा ताबा सुटला तर संपूर्ण घर हे दोन सदस्य विरोधात असे इक्वेशन पाहायला मिळाले. आज 'भाऊच्या धक्क्या'वर या बदललेल्या इक्वेशनवर चर्चा होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, असं म्हणत रितेश भाऊ अरबाजची कानउघडणी घेताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात जोडीचा मामला होता. 'बिग बॉस'ने घरात जोड्या पाडल्या होत्या. निक्की आणि अभिजीतची एक जोडी होती. दोन जणांना दहा सदस्य टार्गेट करताना दिसून आले. अरबाजने निक्कीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत अरबाज सर्वांनाच आवडू लागला. अरबाजच्या आतापर्यंतच्या चुकांकडे घरातील सदस्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर याबद्दल बोलताना दिसणार आहे.
भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ अरबाजला निक्कीने अभिजीतसोबत केलेली कोणती गोष्ट आवडली नाही? हा प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर अरबाजचे उत्तर जाणून घेतल्यानंतर रितेश भाऊ त्याला भाऊच्या चक्रव्युहात घेऊन जाणार आहे. रितेश म्हणतोय,"तुम्ही निक्कीच्या बाजूने आहात..त्यांच्या फेव्हरमध्येच आहात हेच मी आता दाखवणार आहे. अरबाज तुम्ही रिअॅलिटी शो केले आहेत. पण हा 'बिग बॉस मराठी' आहे. इथे फक्त रिअॅलिटी चालते." सगळ्यांना सत्य कळावे यासाठी भाऊच्या धक्क्यावर रितेशने चक्रव्युहू रूम उघडली आहे.
वाचा: सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे खेळणार 'एक डाव भुताचा', काय आहे नेमकी भानगड वाचा
रिअॅलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल. अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलं आहे. अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा जिगरबाज तरुण 'बिग बॉस मराठी'च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. तो अभिनेत्री निक्की तांबोळीसोबत खेळ खेळताना दिसत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसत होते. पण अरबाज संपूर्ण घराशी खोटं बोलून निक्कीच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात रितेश देशमुख हा अरबाज आणि निक्कीमध्ये मध्यरात्री झालेले संभाषण दाखवणार आहे.