Bigg Boss Marathi 5 Winner Announced: ‘बिग बॉस मराठी ५’ला अखेर त्यांचा विजेता मिळाला आहे. अतिशय खडतर प्रवास करून इथवर आलेल्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनासोबतच ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे. त्याला ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीसोबतच रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. यासोबतचा त्याला केदार शिंदे यांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे.
सूरज चव्हाण याला बक्षीस म्हणून १४.६ लाख रुपयांची रक्कम मिळालीच, पण सोबतच त्याच्यावर इतर बक्षिसांचा देखील वर्षाव झाला. त्याला तुनवाल मोटर्सकडून एक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर देखील भेट म्हणून देण्यात आली आहे. त्याची ही मोठी झेप पाहून आता सगळेच त्याचे भरपूर कौतुक करताना दिसत आहेत. लिहिता वाचता ही येत नसलेल्या सूरजने आपल्या जिद्दीने इथवरची मजल मारली आहे. त्याचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. सूरजने हा प्रवास करण्यासाठी खूप संघर्ष केला होता. एका गावातून आलेल्या या मुलाने ही किमया करून दाखवली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच सूरज चव्हाणची सर्वत्र चर्चा होताना दिसली होती. त्याने घरातील इतर स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण, सूरज जेव्हा 'बिग बॉस मराठी' शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला, तेव्हा त्याच्याकडे फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल होती. या शोच्या सेटवर आल्यानंतर त्याला कपडे दिले गेले. या परिस्थितीतून वर आलेल्या सूरजने अल्पावधीतच आपल्या साधेपणाने आणि वागणुकीने सगळ्यांची मने जिंकली.
छोट्या खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटी विश्वात स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे. 'बिग बॉस मराठी ५'मुळे सुरज प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला. रियॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर, आता लवकरच तो मोठ्या पडद्यावरही झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज आपल्या आगामी 'राजाराणी' चित्रपटात आपला दमदार अभिनय करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी 'राजाराणी'च्या पोस्टरने सर्वांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार आहे, ज्यामध्ये सुरज महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नायकाच्या दोस्ताच्या भूमिकेत त्याला पाहणे फारच रंजक ठरणार आहे. त्याचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ पासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.