Bigg Boss Marathi 5 Update: छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. काही दिवसांपूर्वी सुरु झालेला बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. दिवसेंदिवस स्पर्धकांचे वागणे, त्यांच्यामधील वाद आणि खेळण्याची पद्धत ही आणखी रंजक होत चालली आहे. जवळपास १४ दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. पण आता काही कारणास्तव या वाईल्ड कार्ड एण्ट्रीला घराबाहेर जावे लागले आहे.
संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री घेताच घरातील समीकरणे बदलले होती. घरात एक वेगळाच राडा सुरु झाला होता. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा तसा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. उलट अनेकांनी याला वाईल्ड कार्ड म्हणून का घेतले? असा प्रश्न उपस्थित केला होता. आता संग्रामला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संग्रामच्या दुखापतीविषयी बिग बॉस बोलताना दिसत आहेत. “तुमच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे तुमच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. पण दुखापत गंभीर होऊ नये यासाठी आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर आपल्या हाताला आणि पाठीला दुखापत झाली असल्याचे म्हटले. या उपचारासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे आणि हे बिग बॉसच्या घरात शक्य नाही. यामुळे तुम्हाला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावे लागत आहे” असे बिग बॉस म्हणाले.
संग्राम घरातून बाहेर पडताच नेटकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे. एका यूजरने 'असाही हा काही कामाचा नव्हता' असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने 'बरं झालं.. आम्हाला तर तो आल्या दिवसापासूनच नको होता' अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर संग्राम चौगुले घराबाहेर पडल्यामुळे नेटकऱ्या आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
वाचा: ७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले
बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला. या टास्कमध्ये वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले. आता भाऊच्या धक्क्यावर कोणता स्पर्धक बाहेर पडणार हे लवकरच कळेल.