छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सिझनमध्ये गोलीगत सूरज चव्हाण सहभागी झाला आणि त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. गोलीगत सूरजला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळलाच नाही, असे म्हटले जाऊ लागले. पण त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील सूरजच्या खेळीचे कौतुक केले. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता अंकिता वालावलकर आणि पॅडी हे सूरजविषयी बोलताना दिसतात.
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,"सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं." त्यावर पॅडी म्हणतो,"बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता." त्यावर अंकिता म्हणते,"सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली."
सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने 'ही ड्यूटी नकों ती ड्यूटी नकों कधी बोलला नाही, शिक्षण नसुनही कधी भाषेत माज्ज दुसऱ्यांचा अपमान दिसला? नाही कोणा बद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? नाही कोणत्या मुलीचा अपमान केला? नाही गेम मधे टिकण्या साठी खोटं प्रेमाच नाटक , रडण रुस्ण फुग्ण असल काही एक केल का नाही एकटा राहतो एकटा खेळतो एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार दिसणार' अशी कमेंट करत पाठिंबा दिला आहे. तसेच इतर नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत सूरजला पाठिंबा दिला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसत आहे. निक्की अरबाज- वैभव इरिना यांनी डान्स केला. तर अभिजित सावंत आणि आर्याने गाणे सादर केले. आता आजच्या भागात वर्षा उसगावकर आणि जान्हवी डान्स करणार आहेत. तसेच इतर स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...
सूरज चव्हाणने 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा गुलिगत हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. त्याला बिग बॉसच्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सूरजचे आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर ९ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा आहे.