Bigg Boss Marathi 5: कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झालेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी ५' हा पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या शोमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दशके काम करणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर या सहभागी झाल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच वर्षा यांचा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. पण शोमधील स्पर्धक निक्की तांबोळी ज्या प्रकारे त्यांच्याशी प्रत्येक गोष्टीवरुन भांडत आहे ते पाहून नेटकरी देखील संताप व्यक्त करत आहेत. कालच्या भागात निक्कीने केलेले कृत्य पाहून सर्वांनाच राग अनावर झाला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात असे पहिल्यांदाच झाले आहे की कलाकारांना झोपण्यास बेड नाहीत. घरात एण्ट्री करताना शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने कलाकारांना बिग बॉस करंसी आणि काही लग्झरी गोष्टींची ऑफर दिली होती. घरातील बऱ्याच स्पर्धकांनी बिग बॉस करंसी हा पर्याय निवडला. पण जेव्हा राशन खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा बेडची किंमत जास्त असल्यामुळे ते न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना खाली झोपावे लागत आहे.
बिग बॉसच्या घरात झोपण्यासाठी बेड नसल्यामुळे रोज स्पर्धक खाली झोपतात. मात्र, जान्हवीने बिग बॉस करंसी ऐवजी बेड घेतल्यामुळे तिच्या एकटीकडे बेड आहे. पहिल्या दिवसापासून ती बेडवर झोपत आहे. वर्षा उसगावकर या गेले तीन ते चार दिवस बेडरुमच्या मध्यभागी झोपत होत्या. पण त्यांना त्रास द्यायचा म्हणून निक्की आणि जान्हवी तिचा बेड सोडून त्यांच्या जागेवर झोपायला येतात. निक्की वर्षा यांचे स्लिपिंग बॅग उचलून फेकून देत. या सगळ्यात वर्षा या जराही खचून गेल्या नाहीत. त्या दोघींशी भांडत तेथेच बसल्या. 'हा तर अन्याय' असे त्या स्पष्ट म्हणाल्या. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनीही जान्हवी आणि निक्कीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकत नाहीत. शेवटी वर्षा या बेडरुमच्या दारात जाऊन झोपतात.
वाचा: 'आगाऊ नको, डांबरट नको…', छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी
जान्हवीने सकाळी उठल्यावर वॉशरुममध्ये हा सगळा प्लान तिचा होता असे सांगितले. तेव्हा अभिजित सावंतने जान्हवीला चांगलेच सुनावले. 'या सगळ्यात समस्या ही झाली की त्यांना रस्त्यात झोपावे लागले. आम्हाला जायला यायला जागा राहिली नव्हती. त्यांच्या बेडवरुन जावे लागत होते. आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की वर्षा ताईंसारखा मोठा कलाकार रस्त्यात झोपतोय आणि आम्ही त्यांच्या बेडवरुन जातोय. तू महाराष्ट्रातील कलाकार आहेस तुला माहिती आहे त्यांची कारकिर्द, त्या आज कुठे उभ्या आहेत' असे अभिजित सावंत म्हणाला.