Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सध्या भरपूर राडे पाहायला मिळत आहेत. नुकतीच या घरात मारमारी पाहायला मिळाली. एका टास्क दरम्यान निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यातील वाद इतका वाढला की, आर्याने निक्कीवर हात उचलला. बिग बॉसच्या घरातील मुलभूत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि हिंसा झाल्याचे म्हणत आता बिग बॉसने आर्या जाधवला शिक्षा दिली आणि तिला घरातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे. यामुळे आता प्रेक्षक वर्गात चांगलेच नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिग बॉसच्या या निर्णयावर सगळेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर देखील यांचे प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात काही स्पर्धक पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच निक्की तांबोळी हिने सगळ्यांनाच खूप त्रास दिला आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्वतःची मर्जी वापरून, स्वतःला हवं तसं खेळ खेळणाऱ्या निक्की तांबोळीला आता मोठा धक्का बसला आहे. एका टास्क दरम्यान झालेल्या वादात आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. यानंतर पुन्हा एकदा निक्की मोठा हंगामा करताना दिसली होती. मला न्याय हवा, बिग बॉस आर्याला बाहेर काढा, असं निक्कीने म्हटलं होतं. मात्र, या दरम्यान सोशल मीडियावर सगळेच आर्याला पाठिंबा देताना दिसले होते.
आतापर्यंत निक्कीने अनेकदा टास्क दरम्यान इतर स्पर्धकांसोबत केस खेच, कपडे ओढ असे प्रकार केले आहेत, तेव्हा मात्र बिग बॉस काहीच म्हणाले नाही, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहे. आता ‘भाऊचा धक्का’ या भागात आर्याला बिग बॉसने घरातून तत्काळ बाहेर निघून जाण्याची शिक्षा दिली. अगदी कुणालाही निरोप देण्याची संधी न देताच आर्याला या घराच्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे आता प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर आता प्रेक्षक आपल्या तीव्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
आर्याला बाहेर काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ‘आर्याने जे केलं ते १००% बरोबरच केलं, कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडणं गरजेचं होतं. अख्खा महाराष्ट्र आर्या सोबत आहे.’ तर, ‘आर्यानी चुक केली, परत २ हाणायला पाहिजे होत्या’, ‘बंद करा शो बघायचं, निक्कीचा बिग बॉस चालू आहे’, ‘बाय बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस’, ‘आर्याला जर बाहेर काढलं बिग बॉस नंतर आम्ही बिग बॉस पाहणार नाही बिग बॉसने ही गोष्ट ध्यानात ठेवावी’, ‘निक्कीनं काय पण केलं तर चालतंय, पणं तेचं दुसऱ्याने केल्यावर चालतं नाही...’, ‘आतापर्यंत निक्कीने काय काय नियम मोडलेत, तरी तिला काय शिक्षा नाही’, ‘निक्की सगळ्यांची अक्कल काढते, तेव्हा कुठे असतात बिग बॉस? तेव्हा का तिला काही बोलत नाही?’ अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहेत.
संबंधित बातम्या