Bigg Boss Marathi 5:‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सध्या रोजच काहीना काही ड्रामा पहायला मिळत आहे. सध्या या घरात एका नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून संग्राम चौगुले याने या घरात एन्ट्री घेतली आहे. संग्राम घरात आल्यानंतर घरातील काही गणित आणि समीकरण बदलताना दिसत आहेत. नुकताच घरात नॉमिनेशन टास्क देखील पार पडला. या टास्कमध्ये घरातील अनेक स्पर्धा या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले आहेत. या दरम्यान आता काहीच स्पर्धकांमध्ये चांगलीच बाचाबाची आणि वादावादी होताना पाहायला मिळत आहे
बिग बॉस मराठी सीझन ५ मधील स्पर्धक निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांच्यात पहिल्या दिवसापासूनच चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. अभिजीत सावंत वेळोवेळी निक्कीची बाजू घेऊन वाद घालताना देखील दिसला होता. तर, अभिजीत सोबतच्या मैत्रीमुळेच निक्की आणि अरबाज यांच्यात कडाक्याची भांडण देखील झाली होती. मात्र, तरीही दोघांच्या मैत्रीत फूट पडली नाही. परंतु, आता हे चित्र बदलताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वीच अभिजीत आणि निक्कीमध्ये बाचाबाची झाली होती. तर, आता या दोघांमध्ये चांगलीच वादावादी होताना दिसणार आहे.
निक्की आणि अरबाज यांची भांडण झाली, तेव्हा अभिजीतने निक्कीची साथ दिली होती. निक्की खरंच आपल्याशी मैत्री करतेय, असं वाटून अभिजीतने आपल्या मनातील अनेक गोष्टी तिच्याशी शेअर केल्या होत्या. त्यावेळी त्याने वैभवबद्दल देखील काही गोष्टी निक्कीला सांगितल्या होत्या. मात्र, आता नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर बिथरलेल्या निक्की तांबोळीने अभिजीत वैभव बद्दल काय बोलला होता, ते आता त्याला सांगितलं आहे. त्यामुळे चिडलेल्या वैभवने अभिजीतला जाऊन, ‘तू तिला माझ्याबद्दल काय सांगितलं? तू मागून का काही सांगतोस?’, असं विचारलं.
यावर अभिजीत म्हणाला की, ‘मी कुणाशीही काहीही बोललेलो नाही.’ यानंतर दोघांची बाचाबाची सुरू असताना निक्की तांबोळीने मध्ये पडून, ‘अभिजीत तू मला बोलला होतास की, वैभववर विश्वास ठेवला होता. मात्र त्याने पुन्हा एकदा विश्वासघात केला. तू मला हे बोलला होतास की, नाही हे कबूल कर.’ निक्कीने असं बोलताच अभिजीतला त्याने बोललेली गोष्ट कबूल करावी लागली. मात्र, यावेळी अभिजीत निक्की तांबोळीवर चांगलाच वैतागलेला दिसला. ‘तुझ्यासारखे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे, तुझ्यासारख्या लोकांशी मैत्रीच नको. तुझ्यावर विश्वासही ठेवू शकत नाही’, असं म्हणत अभिजीतने निक्कीशी असलेली मैत्री तोडली आहे.