Bigg Boss Marathi 5 Latest Update: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा दुसरा ‘भाऊचा धक्का’ भाग पार पडला आहे. यंदा या घरात पहिल्या दिवसापासून राडे पाहायला मिळत आहेत. कुणी कुणाला नावं ठेवतंय, तरी कुणी घराबाहेर काढण्याच्या धमक्या देतंय. मात्र, या शोमध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धकांनी बोलण्याच्या बाबतीत तर अक्षरशः मर्यादा ओलांडली आहे. या आठवड्यातही हाच प्रकार पाहायला मिळाला. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने काही स्पर्धकांची लायकी काढली, तर वर्षा उसगांवकर यांचा देखील भरपूर अपमान केला. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग जान्हवीवर चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला होता. सगळ्यांच्याच नजरा ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुख काय बोलणार याकडे लागल्या होत्या.
आता नुकत्याच पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ भागात रितेश देशमुख याने घरात पडलेल्या दोन्ही टीम्सची चांगलीच कान उघडणी केली आहे. यावेळी त्याने निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी हा चौघांना चांगलेच खडे बोल सुनावले. तर, जान्हवी किल्लेकर हिला चांगलीच समज दिली. गेल्या आठवड्यात जान्हवी किल्लेकर अनेक स्पर्धकांना घराबाहेर काढण्याची धमकी देताना दिसली होती. मात्र, यावेळी तिला सुनावताना रितेश देशमुख थेटच म्हणाला की, ‘इतरांचं मला माहित नाही ते कधी बाहेर पडतील, पण तुम्ही हे असंच वागत राहिलात तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल, हे नक्की आहे’. रितेशने घेतलेली ही भूमिका सगळ्याच प्रेक्षकांच्या मनातील आहे. त्यामुळे प्रेक्षक आनंदून गेले आहेत.
‘चांगली जिरवली रितेश भाऊ यांची... आज जान्हवी, अरबाज आणि वैभवची... खासकरून त्या जान्हवीची. अगदी आमच्या मनातलं बोललात’, ‘धन्यवाद रितेश भाऊ. खऱ्याला न्याय आणि खोट्याला शासन दिल्याबद्दल. आपल्याकडून हीच अपेक्षा सबंध महाराष्ट्राला होती. प्रत्येकाला त्याची त्याची जागा दाखवून दिलीत आपण’, ‘दादागिरी करून, पराभव पत्कराता येत नाही, ते कधीच यशस्वी होत नाही हे रितेश भाऊ दाखवून दिले’, ‘जान्हवीची चांगली जिरवली भाऊंनी. धन्यवाद भाऊ हीच अपेक्षा होती’, 'जाळ आणि धूर मस्तच काढला. हिच्या बाबाचं घर नाही हे’, ‘वर्षा मॅम खूप मोठ्या अभिनेत्री. त्यांचा मान सन्मान आदर व्हायला पाहिजे, ही जी नवीन लोकं आहेत, ज्यांना कुणी ओळखत नाही, ती लोकं वर्षा मॅमला घाण बोलतात, असं ऐकावं वाटतं नाही...’ अशा शब्दांत प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.