Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता रोज नवनवे ड्रामे होताना पाहायला मिळत आहेत. रोजच घरात मोठे राडे आणि भांडणं होत आहेत. आता घराची कॅप्टन निक्की तांबोळी हिने घरातील सगळ्यांशी वैर पत्कारलं आहे. अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण यांच्यात मोठे वाद झाल्यानंतर आता ग्रुप ए पूर्णपणे तुटला आहे. तर, निक्की आता मुद्दामहून सगळ्यांना त्रास देताना दिसत आहे. मात्र, या सगळ्यात अभिजीतशी तिची असलेली मैत्री अजून टिकून राहिली आहे. अभिजीत निक्कीच्या कलाने सगळ्या गोष्टी करत होता. मात्र, आता निक्कीचा हा एकमेव मित्र देखील तुटणार आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सध्या मानकाप्याच्या टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये घरातील सगळ्या स्पर्धकांना दोन लोकांच्या जोडीमध्ये बांधण्यात आले आहे. या जोड्या बांधून ठेवण्यासाठी त्यांना एक पट्टा देण्यात आला आहे. हा पट्टा बांधूनच त्यांना घरात जोडीने वावरावं लागत आहे. आता घरातील सगळं सामान संपलं आहे. त्यामुळे हे सामान विकत घेण्यासाठी बीबी करन्सीची गरज आहे. तर, ही बीबी करन्सी मिळवण्यासाठी आता स्पर्धकांना एक विशेष टास्क खेळावा लागणार आहे. या टास्कसाठी ३ जोड्यांच्या दोन टीम बनवण्यात आल्या असून, या टीममधील लोकांना जोडीने एका गुहेच्या तोंडापाशी जायचे आहे. तर, यातील एकाला बाहेर थांबून, दुसऱ्याला आतमध्ये जाऊन, गुडघ्यावर रेंगत सोन्याची नाणी बाहेर उभ्या असलेल्या जोडीदाराकडे द्यायची आहेत.
या टास्कमध्ये बाहेर उभ्या असलेल्या एका स्पर्धकाला आपल्या जवळील नाणी वाचवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या टास्कमध्ये देखील खेचाखेची, ओढाओढी पाहायला मिळणार आहे. यातही आता निक्की आपला स्वतःचा वेगळा खेळ सुरू करणार आहे. ती समोरच्या टीमची नाणी अपात्र ठरवून फेकून देणार आहे. यावेळी घरातील सगळेच लोक तिला सामान मिळवणं किती महत्त्वाचं आहे, हे तिला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, निक्की कुणाचं काही ऐकायला तयार नाही. त्यामुळे आता सगळे तिच्यावर चिडणार आहेत.
दोन दिवस निक्कीची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडणारा अभिजीत आता तिच्यावर चिडणार असून, ‘मला हिचा पार्टनर नाही राहायचं’, असं म्हणणार आहे. तर, आपलं बंधन सोडून तो निघून जाताना दिसणार आहे. अभिजीतचा हा निर्णय ऐकून आता घरातील सगळे त्याचं कौतुक करणार आहे. मात्र, आता अभिजीत पुढे काय निर्णय घेणार, हे लवकरच कळणार आहे.