Bigg Boss Marathi 5 Latest update: ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये आता पहिल्याच आठवड्यात धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात ‘भाऊचा धक्का’ हा विशेष भाग पार पडला. या भागात होस्ट रितेश देशमुखने अनेकांना फटकारलं आहे. याच भागात त्याने काही स्पर्धकांच्या मैत्रीवर देखील प्रश्न उपस्थित केला होता. या घरात झालेली मैत्री एक-दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकत नाही, अशा शब्दात रितेश देशमुखने सगळ्यांवरच टिकेची झोड उठवली होती. अखेर रितेशचं हेच म्हणणं आता खरं होताना दिसत आहे. बिग बॉस मराठी ५च्या घरात पहिल्या दिवसापासूनच जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अरबाज शेख आणि वैभव चव्हाण हे चौघे मिळून इतर स्पर्धकांना चांगलेच हैराण करत होते.
चौघेही एकमेकांचे मित्र असून, त्यांनी एक ग्रुप तयार केला होता. मात्र, आता त्यांच्या या ग्रुपमध्येच फूट पडताना दिसत आहे. नुकताच घरात कॅप्टनसी टास्क जाहीर करण्यात आला. यावेळी स्पर्धकांना एकमताने सहा स्पर्धकांना या कॅप्टनसी शर्यतीतून बाहेर काढायचं होतं. सहा स्पर्धकांना कॅप्टनसीमधून बाद केल्यानंतर बिग बॉसने घरातील इतर स्पर्धकांना बीबी करन्सी देऊ केली आहे. या बीबी करन्सीमधून स्पर्धकांना घरातील सामान आणि गरजेच्या वस्तू विकत घेता येणार आहेत. तर, आर्या आणि जान्हवी यांना बिग बॉसने ३० हजारांची जास्तीची बीबी करन्सी दिली आहे. आणि ही करन्सी सांभाळण्याची जबाबदारी देखील त्या दोघांचीच असल्याचं बिग बॉसने म्हटलं आहे.
बिग बॉसने हे जाहीर करताच इतर स्पर्धक ही बीबी करन्सी चोरायची असं ठरवून रात्री झोपलेल्या स्पर्धकांना उठवून चांगलाच गोंधळ आणि गदारोळ घालतात. यावेळी घरात अरबाज, वैभव आणि जान्हवी यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या, ज्या निक्कीला अजिबात पटल्या नाहीत. मात्र, यावरूनच निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात चर्चा देखील झाली. तर, निक्की तांबोळी हिने अभिजीत सावंतची बाजू घेतल्याने अरबाज शेख तिच्यावर चांगलाच चिडला.
दोघांमध्येही यावेळी खटके उडाले. जोपर्यंत अरबाज आपली माफी मागत नाही, तोपर्यंत आपण त्याच्याशी बोलणार नाही, असं म्हणत निक्कीने देखील तिथून काढता पाय घेतला. दुसऱ्या, दिवशी देखील निक्कीने त्याच्याशी बोलणं टाळलं. त्यावेळेस जान्हवी किल्लेकरने निक्कीच्याच विरोधात बोलण्यास सुरुवात केली. ‘हिला वाटतं की, सगळ्यांनी हिच्या मनाप्रमाणेच खेळलं पाहिजे, ही असं ठरवू शकत नाही’, असं म्हणत जान्हवीने उलटे सूर गाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मैत्रीण म्हणवणाऱ्या मैत्रिणीनेच आता एकमेकींची कागळी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.