Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व म्हणजेच ‘बिग बॉस मराठी ५’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शो प्रचंड चर्चेत होता. प्रेक्षक आतुरतेने या शोची वाट बघत होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता फार न ताणून धरता आता हा शो सुरू करण्यात आला. ‘बिग बॉस मराठी ५’च्या पहिल्याच आठवड्यात मोठा राडा पाहायला मिळाला. आता पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन पार पडलं आहे. १६ स्पर्धकांमधून आता एका स्पर्धकाला बेघर व्हावं लागलं आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांना आता घराबाहेर पडावं लागलं आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात नुकताच ‘भाऊचा धक्का’ हा भाग पार पडला. यामध्ये रितेश देशमुख याने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. आठवडाभर या घरात घडलेल्या अनेक घटनांवर रितेश देशमुखने स्पर्धकांना चांगलंच सुनावलं. या आठवड्यात कोणाचं काय चुकलं? कोण बरोबर होतं? कुणी काय करायला हवं आणि कुणाचा खेळ आणखी सुधारायला हवा, यावर रितेश देशमुखने ऊहापोह केला. आठवड्यात रविवारच्या दिवशी एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडते. या आठवड्याच्या मध्यात म्हणजेच ‘बिग बॉस मराठी ५’च्या पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनमध्ये पुरुषोत्तमदादा पाटील एलिमिनेट झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच घरात फारसा काही सहभाग न दिसल्याने पुरुषोत्तमदादा पाटील यांना बेघर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुखने या आठवड्यात नॉमिनेट आणि एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांची घोषणा केली. योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. तर, सुरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर हे दोघेही आधीच सेफ झाले होते. त्यामुळे आता तिघांपैकी कोण घराबाहेर जाणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अखेर पुरुषोत्तम दादांचं नाव घेतल्यानंतर इतर स्पर्धकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या आठवड्यापुरते धनंजय पोवार आणि योगिता चव्हाण हे देखील सेफ झाले आहेत. पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात कॅप्टनसीचा टास्क पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचे प्रसिद्ध मठाधिपती असणारे पुरुषोत्तमदादा पाटील लाखो भक्तांचे लाडके आहेत. कीर्तनाचा वारसा लाभलेले पुरुषोत्तमदादा पाटील आजच्या तरुणाईचे मार्गदर्शक आहेत. आपल्या कलेच्या आणि विचारांच्या बळावर पुरुषोत्तमदादांनी लाखो भक्तांचे हृदयात हक्काचे स्थान मिळवले आहे.