Bigg Boss Marathi 5 Latest Update Day 31: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता पहिल्यांदा टोकाचे वाद होताना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर, आता अरबाज पटेल घरातील सामानाचं नुकसान करत, भांडी फोडताना दिसणार आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात अरबाज निक्कीशी वाद घालताना घरातील सामान आणि भांडी उचलून फेकताना दिसला आहे. यामुळे आता सगळेच हैराण झाले आहेत. सगळेच अरबाज पटेल याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अरबाज देखील शांत होण्याचं नाव घेत नाहीये. यामुळे आज घरात मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे.
गेल्या आठवड्यातच टीम एमध्ये वादाची ठिणगी पडताना दिसली होती. यातच ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुखने निक्की तांबोळी हिला तिच्याच ग्रुपमधील काही लोकांचे व्हिडीओ दाखवले, ज्यात ते निक्की विरोधात बोलताना दिसले होते. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर आता निक्की तांबोळी चांगलीच संतापली आहे. तिने आपण या टीममधून बाहेर पडत असल्याचं तर म्हटलंच. मात्र, या टीममधील कुणालाच पुढे जाऊ देणार नाही आणि ट्रॉफी जिंकू देणार नाही, असा निर्धार तिने केला आहे. आता घरात तिने टीम एशी फटकून वागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता वाद वाढताना दिसणार आहे.
आता बिग बॉसने घरात एक टास्क दिला आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धकांना जोड्यांमध्ये राहायचे आहे. यात टास्कमध्ये निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांची जोडी बनवण्यात आली आहे. तर, अरबाज पटेल याच्यासोबत आर्या जाधव हिची जोडी बांधून देण्यात आली आहे. हा टास्क सुरू झाल्यापासून निक्की आणि अरबाज दोघांनीही एकमेकांना जोरदार टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. आता निक्की अरबाज पटेल याची टर उडवताना दिसणार आहे. यामुळे अरबाज चांगलाच संपणार आहे. या घरात सुरुवातीपासून दोघांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. ज्यात आता कधीही भरून न येणारी दरी निर्माण झाली आहे. याचाच मोठा परिणाम आता दिसणार आहे.
निक्कीचं वागणं पाहून आता अरबाज पटेल याचा रागावरचा ताबा सुटणार आहे. निक्की तुझ्या वागण्याने मला त्रास होतोय, असं अरबाज तिला सांगणार आहे. मात्र, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निक्की पुन्हा एकदा त्याची खिल्ली उडवणार आहे. त्यामुळे आता संतापलेला अरबाज पटेल घरात धुमाकूळ घालणार आहे. अरबाज या वादादरम्यान अरबाज किचनमधील काही भांडी जमिनीवर फेकणार आहे. तर, बेडरूम एरियातील खुर्ची उचलून देखील फेकणार आहे. यामुळे आता घरात राडा पाहायला मिळणार आहे.