Bigg Boss Marathi 5 Day 24 update: ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोचा पाचवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरामध्ये रोजच काहीना काही वेगळे ड्रामे आणि हंगामे पाहायला मिळत आहे. या घरात दोन गट पडले असून, हे दोन्ही गट एकमेकांना चांगलीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोणत्याही टास्क दरम्यान टीम ए म्हणजेच निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण आणि इरिना फारच आक्रमक होताना दिसतात. या टीममधील काही सदस्यांचा आपल्या तोंडावर अजिबातच ताबा नाही. ‘भाऊचा धक्का’ या भागात रितेश देशमुखने देखील या स्पर्धकांना वारंवार याविषयी ताकीद दिली होती. मात्र, पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकर हिची जीभ घसरताना दिसली आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून जान्हवी किल्लेकर हिच्या विचित्र वागण्याची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मालिकेमध्ये खलनायिका साकारलेली जान्हवी खऱ्या आयुष्यात देखील खलनायिका बनताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवीने गेल्या २४ दिवसांत अनेकांचा अपमान केला. खेळाच्या रागात तिने या घरातील ज्येष्ठ कलाकारांच्या करिअरवर देखील बोट उचललं आहे. काहीच दिवसांपूर्वी वर्षा उसगांवकर याच्या अभिनय कारकीर्दीवर ताशेरे ओढणाऱ्या जान्हवीने आता प्रेक्षकांच्या लाडक्या पॅडीदादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावर टीका केली आहे.
या घरात नुकताच पंचनामा टास्क पार पडला. या टास्कमध्ये दोन्ही टीम्सना एकमेकांच्या विधानांवर सत्य की असत्य ठरवून बझर वाजवायचा होता. बिग बॉस एका टीमच्या सदस्याविषयी एक वक्तव्य करणार होते. तर, आपल्याविषयी केलेले हे वक्तव्य खरे आहे की खोटे, हे आधी त्या स्पर्धकाने ठरवायचे होते. त्यानंतर स्पर्धकाने दिलेल्या उत्तराशी विरुद्ध टीम सहमत आहे की नाही, हे त्यांनी सांगायचे होते. या खेळात नियमांनुसार सगळ्यांनीच लाल बझर वाजवल्याने आता एकाही टीमला बीबी करन्सी मिळालेली नाही. मात्र, हा टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा टीम बी मधील सदस्यांवर टीका करताना दिसली.
यावेळी जान्हवी किल्लेकर हिने पंढरीनाथ कांबळे यांना जोकर, विदुषक म्हणत ‘त्यांनी आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग केली. आता इथे येऊन फुटेज खातायत’, असं म्हटलं. या आधी तिने वर्षा उसगावर यांना वाईट अभिनेत्री म्हणत त्यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार हे फालतू असल्याचे म्हटले होते. मात्र, आता तिने पुन्हा एकदा एका ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेत्याच्या कारकीर्दीवर बोट उचलल्याने आता प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत.