Bigg Boss Marathi 5 Latest Update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता वेगळेच राडे पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सुरू झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे. या पर्वात रोजच वेगवेगळे वाद पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरात वाद पाहायला मिळाले आहेत. रितेश देशमुखने या घरातील काही स्पर्धकांना ‘भाऊचा धक्का’ देखील दिला आहे. मात्र, तरीही काही जन अजूनही सुधारलेले दिसत नाहीयेत. एकीकडे जुने वाद सुरूच असताना, आता ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे. सध्या घरात दोन पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांवरून घरात युद्ध रंगणार आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या स्पर्धकांना आता एक नवा टास्क मिळाला आहे. या टास्कसाठी घरात दोन छोटे पाहुणे आले आहेत. बिग बॉसच्या घरात या खास टास्कसाठी दोन बाहुले पाठवण्यात आले आहेत. या दोन्ही बाहुल्यांना लहान बाळं समजून सांभाळावं लागणार आहे. या बाळांनी आवाज केले की, त्यांचे त्यांचे लंगोट बदलून आणि त्याला खाऊपिऊ घालून शांत करायचे आहे. तर, जितका वेळ बाळ घरात आहे, तितका वेळ त्याच्याशी बोलायचे आहे. बाळाशी बोलण्यासाठी केवळ मराठी भाषाच वापरायची आहे. हा टास्क वाटत सोपा असला तरी, अजिबात सोपा नाहीये.
या बाळांना सांभाळताना घरातील स्पर्धकांना नाकीनऊ येणार आहेत. या टास्कसाठी घरात दोन टीम पाडण्यात आल्या आहेत. दोन्ही टीमकडे एक-एक बाळाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बाळांना भूक लागली किंवा त्यांची लंगोट बदलण्याची वेळ आली की, स्पर्धकांना काही खास गोष्टी कराव्या लागणार आहेत. बाळाची लंगोट बदलण्याची वेळ आली की, टीममधील एका स्पर्धकाला स्विमिंग पूलमध्ये जाऊन स्वतःला पूर्ण बुडवून स्वच्छ करायचे आहे, आणि बाळाचा लंगोट बदलायचा आहे. या दरम्यान दुसऱ्या टीमने त्यांना अडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर बाळाला भूक लागली की, दिलेले सगळे बेबी फूड एका सदस्याने पूर्ण संपवायचे आहे. बाळाला सांभाळताना आणि त्याच्याशी बोलताना एकही इंग्रजी शब्द वापरायचा नाही.
या कार्यात वैभव चव्हाण आणि आर्या हे दोघे संचालक आहेत. त्यांना टीमच्या चुका शोधून त्या फळ्यावर लिहायच्या आहेत. प्रत्येक चुकीसाठी टीमला देण्यात आलेल्या १.५ लाख बीबी करन्सीमधून ५ हजार वजा होणार आहेत. या टास्क दरम्यान अरबाज पुन्हा एकदा आपल्या शारीरक बळाचा वापर करताना दिसणार आहे. तर, निक्की तांबोळी आणी जान्हवी किल्लेकर त्यांच्या अरेरावी पणाने सगळ्यांना पुन्हा एकदा त्रास देताना दिसणार आहे.