Actress Varsha Usgaonkar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या सौंदर्याचे रहस्य सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहे. वयाच्या ५६व्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज आहे. पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्यांचा चेहरा चंद्रासारखा चमकदार आणि सुंदर आहे. त्यांच्या या सौंदर्याचे रहस्य काय असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. या प्रश्नाचे उत्तर आता 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातून मिळाले आहे. स्वतः वर्षा उसगावकर यांनी आपल्या सौंदर्याचं गुपित उघड केलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा उसगावकर या आठवड्याच्या कॅप्टन झाल्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांच्यासाठी कॅरामल कस्टर्ड बनवून जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी वर्षा ताईंनी कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले. वर्षा उसगावकर कॅमेरासमोर येऊन म्हणाल्या की, ‘आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरात आज कॅरामल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने स्वतः वेळात वेळ काढून हा चविष्ट पदार्थ माझ्यासाठी बनवला आहे. कॅरामल कस्टर्ड खाताना मला खूप आनंद होतोय. आज मला असं वाटतंय की, या घरात कॅप्टनसीचं खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन झालंय.’
आपल्या आरसपानी सौंदर्याचे रहस्य सांगताना वर्षा ताई म्हणाल्या, ‘आता तुम्हाला माझ्या सुंदर दिसण्याचं रहस्य कदाचित कळलं असेल. मी सडपातळ असण्याचं सगळ्यात मोठं रहस्य हेच आहे की, मी मला आवडणारे सगळे पदार्थ बिनधास्त खाते. मात्र, त्यासोबतच मी रोज प्राणायाम, योगासनं करते आणि केवळ घरचं जेवण घेते. हेच माझ्या या मखमली सौंदर्याचं रहस्य आहे.’
वर्षा ताईंच्या मते, सौंदर्य हे केवळ बाह्य रूप नाही, तर आंतरिक शांती आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्या नियमित योगासन आणि प्राणायाम करतात, घरगुती जेवण घेतात आणि सकारात्मक दृष्टिकोन राखतात. यामुळे त्यांचे मन शांत राहते आणि त्यांचा चेहरा सदैव प्रफुल्लित दिसतो. मात्र, त्या आवडणारे सगळे पदार्थ मग ते गोडाचे असो वा चमचमीत, अगदी मनमोकळेपणाने खातात हे ऐकून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण, अनेक लोक फिट दिसण्यासाठी कमी खाणे आणि कठोर व्यायाम करणे महत्त्वाचे आहे, असे मानतात. मात्र, वर्षा उसगावकर यांनी हा समज खोडून काढला आहे.