Vaibhav Chavan Apologies To Fans: ‘बिग बॉस मराठी ५’चं पर्व सध्या चांगलंच गाजत आहे. या पर्वात पहिल्या दिवसापासून राडा आणि धिंगाणा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या या पर्वात सामील झालेल्या स्पर्धकांना शब्दांचा वापर जपून करण्याचा सल्ला रितेश देशमुखने वारंवार दिला होता. मात्र, तरीही काही स्पर्धक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. असंच काहीसं गेल्या आठवड्यात देखील पाहायला मिळालं आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा स्पर्धक अभिनेता वैभव चव्हाण याने गेल्या आठवड्यात मालवणी भाषेचा अपमान केला होता. यानंतर सोशल मीडियावर वैभव विरोधात चांगलाच सातप उसळलेला पाहायला मिळाला. तर, या आठवड्याच्या ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुख यानेही वैभव चव्हाणला खडे बोल सुनावले.
गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात बाळ सांभाळण्याचा टास्क पार पडला होता. या टास्कमध्ये वैभव चव्हाण आणि आर्या हे दोघे संचालक होते. या खेळात दुसऱ्या टीमच्या चुका शोधून त्या फळ्यावर लिहायच्या होत्या. यासाठी टीमची ५००० बीबी करन्सी कापली जाणार होती. या खेळाच्या दरम्यान स्पर्धकांना बाळाशी मराठी भाषेत बोलायचं होतं. यावेळी अंकिता प्रभू-वालावलकर हिने आपल्या खास मालवणी अंदाजात बाळाशी बोललं तर चालेल का?, असा प्रश्न बिग बॉसला विचारला होता. त्यावेळी वैभवने तिचं काहीही ऐकून न घेता तिच्या टीमचे गुण कापले आणि या भाषेवरून तिला ऐकवलं.
या टास्क दरम्यान वैभव चव्हाण अंकिताला म्हणाला की, मालवणी ही मराठी भाषा नाही, तू या भाषेत बोललेलं मला चालणार नाही. वैभवचं हेच वक्तव्य आता त्याला महागात पडलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे महराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही, हे ठरवण्याचा अधिकार वैभवला कुणी दिला? असा संतप्त सवाल महाराष्ट्राच्या जनतेने विचारला. प्रेक्षकांचा हा संताप रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ भागात थेट बोलूनच दाखवला. वैभवच्या या बोलण्याने मायबाप प्रेक्षकांची मने दुखावली गेली असल्याचे देखील रितेश देशमुखने बोलून दाखवले.
रितेश देशमुखने कानउघडणी करताच वैभवने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर, त्याने हात जोडून संपूर्ण महाराष्ट्राची आणि मराठी प्रेक्षकांची माफी देखील मागितली. याचवेळी त्याने अंकिताची देखील माफी मागितली. प्रेक्षक मला नक्कीच माफ करतील, असा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला.