Megha Ghadge : ‘बिग बॉस’ फेम मेघा घाडगेची ठसकेबाज लावणी; ‘अहो पाव्हनं’मध्ये जमली संजय खापरेसोबत जोडी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Megha Ghadge : ‘बिग बॉस’ फेम मेघा घाडगेची ठसकेबाज लावणी; ‘अहो पाव्हनं’मध्ये जमली संजय खापरेसोबत जोडी

Megha Ghadge : ‘बिग बॉस’ फेम मेघा घाडगेची ठसकेबाज लावणी; ‘अहो पाव्हनं’मध्ये जमली संजय खापरेसोबत जोडी

Jan 16, 2023 08:57 AM IST

Megha Ghadge: आपल्या लावणीच्या माध्यमातून मेघा घाडगे हिने महाराष्ट्राची लोककला जपली आहे. पुन्हा एकदा ठसकेबाज लावणी घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Megha ghadge
Megha ghadge

Megha Ghadge: बिग बॉस मराठी ४’मध्ये सहभागी झालेली ‘लावणी क्वीन’ अभिनेत्री मेघा घाडगे आपल्या नृत्याने सगळ्यांनाच घायाळ करत असते. आपल्या लावणीच्या माध्यमातून मेघा घाडगे हिने महाराष्ट्राची लोककला जपली आहे. पुन्हा एकदा ठसकेबाज लावणी घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अहो पाव्हनं... तुमच्यासाठी’ असे शब्द असलेल्या, नजाकतदार लावणीचा म्युझिक व्हिडीओ सप्तसूर म्युझिकनं आणला आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या नव्या, अस्सल लावणीचा आनंद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. अभिनेता संजय खापरेही या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला आहेत.

सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडीओ पाहता येणार आहे. आजपर्यंत संगीतप्रेमींनी सप्तसूरच्या म्युझिक व्हिडीओजना भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ‘अहो पाव्हनं..’ ही अस्सल लावणी रसिकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही.

‘अहो पाव्हनं...’ या गाण्याचं लेखन योगेश पाटील यांनी केलं आहे, तर प्रवीण डोणे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडे यांनी गायलं आहे. मेघा घाडगे यांनी या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केले असून, नृत्यदिग्दर्शक म्हणून अविनाश पायाळ यांनी काम पाहिले आहे. सुरेश देशमाने यांनी छायाचित्रण केले असून, जयेंद्र भांडे या गाण्याचे संगीत संयोजक आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

सप्तसूर म्युझिकनं नेहमीच वैविध्यपूर्ण म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यात कोळीगीतांपासून लग्नगीतांपर्यंतच्या गाण्यांचा समावेश आहे. त्यात आता ‘अहो पाव्हनं...’ या नव्या लावणीच्या म्युझिक व्हिडीओचा समावेश आहे. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे. तर मेघा घाडगे आणि संजय खापरे या म्युझिक व्हिडीओत प्रमुख भूमिकेत आहेत.

Whats_app_banner